

पुणे: मुंबईत शिवसेना ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येण्याच्या चर्चेने जोर धरला असतानाच पुण्यात मात्र मनसेने ठाकरेंसमवेत जाण्याबाबत सावध पवित्रा घेतला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये नक्की कोणत्या राजकीय पक्षाबरोबर युती केल्यास पक्षाला फायदा होईल, याचा अभ्यास करून त्यानंतरच निर्णय घेण्याचा पवित्रा मनसेने घेतला आहे.
राज्यातील रखडलेल्या महापालिकांच्या निवडणुका आता डिसेंबर अखेरीपर्यंत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकींसाठी राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. प्रामुख्याने संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या मुंबई महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीची मोर्चेबांधणी सुरू आहे. (Latest Pune News)
त्यातच मुंबई महापालिकेतील सत्ता टिकविण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू होती. त्यात राज्यात हिंदी भाषेच्या सक्तीवरून दोन्ही बंधुनी एकत्र येऊन विरोध केल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येणार या चर्चांना आणखी बळकटी मिळाली आहे. मात्र, मुंबईत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना मनोमिलनाची ओढ लागली असतानाच पुण्यातील मनसे कार्यकर्ते मात्र संभ्रमावस्थेत आहेत.
मुंबईत दोन्ही ठाकरे एकत्र येण्यामुळे फायदा होणार असल्याची अटकळ बांधली जात असली तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात प्रत्यक्षात एकत्र येण्याचा किती फायदा होणार, असा प्रश्न मनसे पदाधिकार्यांना पडला आहे. याबाबत पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्यांची मंगळवारी (दि. 1) पक्ष कार्यालयात बैठक झाली.
या बैठकीत प्रामुख्याने पुणे आणि पिंपरी - चिंचवड महानगरपालिकांमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाबरोबर युती झाल्यानंतर नक्की कसा आणि किती फायदा होईल, याचा अभ्यास करण्याचा निर्णय घेण्यात आला.
विशेष म्हणजे केवळ ठाकरेच नाही तर भाजप, शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांबरोबर घेतल्यानंतर पक्षाला किती फायदा होईल याचा अभ्यास करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सर्वेक्षण केले जाणार असून त्यासंबंधीचा आलेला अहवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठविला जाईल. त्यानुसार नक्की कोणाबरोबर युती-आघाडी करायची यासंबंधीचा निर्णय ते घेतील, असे मनसेच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले.