

Rajgurunagar bus stand pothole problem
राजगुरूनगर: राजगुरूनगर शहरातील बस स्थानक परिसरात दर वर्षी पहिला पाऊस पडला की खड्डे पडायला सुरुवात होते. यंदा मे महिन्यापासून पाऊस सुरू असल्याने सध्या संपूर्ण परिसरात प्रचंड खड्डे पडले असून, डबक्यांमध्ये पावसाचे पाणी साठवून राहिल्याने प्रवाशांना चालण कठीण होत आहे.
गत वर्षी विधान सभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांमध्ये या बस स्थानकातील खड्डे बुजविण्यासाठी स्व - खर्चाने मुरूम- खड्डी टाकण्याची स्पर्धा लागली होती. परंतु या वर्षी ऐवढी प्रचंड दुरवस्था होऊनही एकही लोकप्रतिनिधी , प्रशासनाचे, आमदार, खासदार यांचे लक्ष नाही. (Latest Pune News)
राजगुरूनगर एस.टी स्टॅन्ड परिसरात सध्या सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साठून दुर्गंधी निर्माण होऊन, प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे. याशिवाय बस चालकांना देखील बस चालवणे कठीण होत आहे. गेले अनेक दिवसांपासून स्टॅन्ड परिसरात ही परिस्थिती असूनही आगार व्यवस्थापक अथवा कोणीही याकडे फारसे लक्ष देत नाही.
राजगुरूनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, पुणे आणि नाशिक शहराला जोडणारे मुख्य शहर देखील आहे. यामुळेच तालुक्यांचे कानाकोपऱ्यात दररोज शेकडो महाविद्यालयानी विद्यार्थी शिक्षणासाठी बसने प्रवास करतात. याशिवाय पुण्यात नोकरी निमित्त देखील अनेक लोक दररोज प्रवास करतात. यामुळेच राजगुरूनगर बस स्थानकात दररोज प्रवाशांची प्रचंड वरदळ असते.
परंतु बस स्थानक परिसरात सर्वत्र मोठ-मोठे खडड्डेच खड्डे पडल्याने मोठी गैरसोय होत आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साठून मोठ-मोठी डबकी तयार झाली आहेत. त्यामुळे या डबक्यातील साचलेले खराब पाणी प्रवाशांच्या अंगावर उडते. प्रवाशांसोबत बस चालकांनाही याचा त्रास सहन करावा लागतोय.
गत वर्षी स्व- खर्चाने खड्डे बुजवणारे उमेदवार कुठे गेले
गत वर्षी विधान सभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांमध्ये प्रसिध्दी व लोकांचा विश्वास निर्माण करण्यासाठी राजगुरूनगर बस स्थानकातील खड्डे बुजविण्यासाठी स्पर्धा लागली होती. शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार सुधीर मुगसे यांनी सर्वात प्रथम स्वखर्चातून हे खड्डे बुजवले होते. थोड्या दिवसांनी याच गटाचे दुसरे इच्छुक उमेदवार अतुल देशमुख यांनी देखील खड्डे बुजवले व काही सुविधा दिल्या.
त्यानंतर विद्यमान आमदार बाबाजी काळे यांनी देखील खड्डे बुजवण्यासाठी पुढाकार घेत स्व- खर्च केला होता. या तिन्ही उमेदवारांनी त्यावेळी आपण केलेल्या कामाचा मोठा टिमकी वाजवली होती. परंतु या वर्षी आमदारासह अन्य इच्छुक उमेदवार कुणालाही राजगुरूनगर बस स्थानक परिसरात पडलेले खड्डे दिसत नाहीत.