

कडूस: खेड तालुक्यातील कडूस गावात बिबट्याचा दिवसाढवळ्या मुक्त संचार सुरू असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी (दि. 29) रात्री 10 वाजता गावात प्रवेश करताच पुलाजवळील परिसरात बिबट्या खाद्याच्या शोधात फिरताना दिसून आला. काही चिकन आणि हॉटेल व्यावसायिकांकडून खराब अन्नपदार्थ तेथे टाकण्यात येत असल्यामुळे बिबट्याने तिथे ठाण मांडल्याचे निदर्शनास आले आहे. वाहनधारकांनी त्याचे दृश्य मोबाईल कॅमेर्यात टिपले.
पूर्वी क्वचित दिसणारा बिबट्या आता वारंवार गावात दिसू लागल्याने ’बिबटे सोडले जात आहेत का?’ असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. परिसरात बिबट्यांची वाढती संख्या, रस्त्यावर खुले वावरणे आणि गोठ्यात घुसून पाळीव जनावरे, कोंबड्यांवर हल्ला करण्याचे प्रकार यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वन विभाग मात्र अद्यापही कोणती ठोस कारवाई करत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. (Latest Pune News)
ढमालेशिवार, शेळके वस्ती, बंदावणे शिवार, टाकेशेती या भागात बिबट्यांनी कुत्र्यांवर हल्ला करून फस्त केल्याच्या घटना घडल्या आहेत. किशोर शेळके यांच्या घराजवळील कुत्रा बिबट्याने ठार मारला, तर शंतनू शिंदे यांच्या कुत्र्यावरही हल्ला झाला. एकाच दिवशी वेगवेगळ्या शिवारात तीन बिबटे दिसल्याने एकूण संख्या किती, हा प्रश्नच निर्माण झाला आहे.
पुर्वी क्वचित कडूस परिसरात आणि तोही रात्रीच्या वेळेस दिसणार्या बिबट्याचे अलिकडच्या काळात दिवसाढवळ्या दर्शन होऊ लागले आहे. कधी भक्ष्याचा पाठलाग करताना मानवीवस्तीत येत बिबट्या नागरिकांवर हल्ला चढवू लागला आहे. कडूससह आगरमाथा, अरगडेशिवार, ढमालेशिवार, गोलापूर, टोकेवाडी या परिसरातील उसाच्या फडात बिबटे राहू लागले आहेत. पाणी पिण्यासाठी भिमा नदीकाठच्या विहिरींवर येणे अशा घटना वारंवार घडत आहेत.
अद्याप पिंजरा लावला नाही
शनिवारी (दि. 28) देखील खालचा आगरमाथा परिसरात जाणार्या रस्त्यावर बिबट्या मांडून बसला होता. वनखात्याने अद्याप पिंजरा लावलेला नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
बिबट्याची पिढी आता जंगल विसरते की काय ?
कोणत्याही प्रतिकुल वातावरणाशी जूळवून घेण्यास तरबेज असलेला बिबट्याचा जन्म आणि पुढील वावरही उसाच्या फडात असलेली बिबट्याची पिढी आता जंगल विसरते की काय ? अशी शंका आली तर नवल नको. त्यामुळे आता केवळ पिंजरा नव्हे तर ठोस आणि दीर्घकालीन संरक्षण धोरण आखणे गरजेचे बनले आहे.