राज कपूर यांचे योगदान अभूतपूर्व : राज्यपाल रमेश बैस

राज कपूर यांचे योगदान अभूतपूर्व : राज्यपाल रमेश बैस
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज कपूर व एकंदर कपूर परिवाराचे सिनेक्षेत्र व व्यवसायातील योगदान अभूतपूर्व आहे. पृथ्वीराज कपूर यांनी सुरू केलेली मनोरंजनाची परंपरा त्यांच्यानंतर राज कपूर यांनी लीलया खांद्यावर पेलली. राज कपूर यांचा काळ खर्‍या अर्थाने भारतीय सिनेसृष्टीचा सोनेरी काळ होता. ज्याने मनोरंजनाशिवाय लोकांना प्रेरितदेखील केले आहे. तसेच त्यांच्या चित्रपटांनी राष्ट्रीय एकता वाढविण्याचे देखील काम केले. त्यांचे चित्रपट व त्यांच्या चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत आहेत, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी काढले.

ते एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ व माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वराजबाग येथील संत ज्ञानेश्वर विश्वशांती डोम येथे आयोजित पहिल्या 'विश्व-राज कपूर सिनेरत्न गोल्डन' पुरस्काराच्या वितरण समारंभ प्रसंगी बोलत होते. या वेळी प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक किरण शांताराम, माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक एन. चंद्रा, प्रसिद्ध अभिनेते गजेंद्र चव्हाण, सिनेनिर्माते सिद्धार्थ काक, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, एमआयटी विश्वशांती कला अकादमीचे सरचिटणीस आदिनाथ मंगेशकर, माईर्स एमआयटीच्या सरचिटणीस स्वाती चाटे-कराड, उपाध्यक्षा ज्योती ढाकणे-कराड, डॉ. मुकेश शर्मा आदी उपस्थित होते.

राज कपूर यांना देण्यात आलेल्या पहिल्या 'विश्व-राज कपूर सिनेरत्न गोल्डन' पुरस्काराचा स्वीकार त्यांचे चिरंजीव व प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते रणधीर कपूर यांनी केला. तसेच या प्रसंगी राज कपूरच्या यांच्या बहुतांश चित्रपटांतील गाण्यांना सुमधुर आवाज देणार्‍या मुकेश यांना देण्यात आलेल्या पुरस्काराचा स्वीकार त्यांचे चिरंजीव नितीन मुकेश यांनी केला. प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी राजबाग पुढे विश्वराजबाग कशी साकारली गेली, याच्या आठवणी सांगितल्या. ज्यात त्यांनी राजबागेचे हस्तांतरण होतानाच्या अनेक प्रसंगांना व राज कपूर यांच्या भावपूर्ण आठवणींना या प्रसंगी उजाळा देताना वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल सर्वांचे आभार देखील मानले. प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी प्रास्ताविक केले. ज्योती ढाकणे-कराड यांनी आभार मानल्यानंतर राष्ट्रगीताने या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

'मेरा जुता है जापानी..!'

अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात असताना मला अनेक देशांचा दौरा करण्याचे भाग्य मिळाले. त्या वेळी युरोपच्या दौर्‍यावर असताना मी जेव्हा भारतातून आलोय, असे सांगितले तेव्हा समोरून आपसुकपणे 'मेरा जुता है जापानीवाला भारतच ना..' असा प्रतिसाद आल्याने माझ्या अंगावर अक्षरशः शहारे आले. या प्रसंगातून राज कपूर यांच्या सिनेमाचे गारूड हे केवळ भारतातच नव्हे, तर विदेशातही किती मोठे होते, हे मला समजले, अशी आठवण देखील राज्यपाल बैस यांनी या वेळी बोलताना सांगितली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news