पुणे: रायवळ आंबा बाजारात; प्रतिकिलो शंभर ते दोनशे रुपये दराने विक्री 

पुणे: रायवळ आंबा बाजारात; प्रतिकिलो शंभर ते दोनशे रुपये दराने विक्री 

पुणे : पुढारी वृत्तसेवा

गोड, नैसर्गिकरीत्या पिकलेल्या रसाळ गावरान रायवळ आंब्याची बाजारात आवक सुरू झाली आहे. रविवारी (दि.29) मार्केट यार्डातील फळविभागात 20 ट्रे आंबा दाखल झाला. त्याला प्रतिकिलोला शंभर ते दोनशे रुपये दर मिळाला. दरवर्षीच्या तुलनेत यंदा रायवळ आंब्याची आवक दहा ते बारा दिवस उशिरा सुरुवात झाली. लहरी हवामानामुळे यंदा आंब्याचा हंगाम लांबला आहे.

रविवारी मुळशी तालुक्यातील गुजरवाडी येथून 20 ट्रे रायवळ आंब्याची आवक झाली असून, एका ट्रेमध्ये साधारणपणे 8 ते 10 डझन आंबे असतात. या आंब्याची 100 ते 120 रुपये किलो भावाने विक्री झाली. हवामान बदलामुळे उशिरा पाड आल्यामुळे गावरान आंबा आणि पायरीची आवक अद्याप झालेली नाही. नागरिकांना या आंब्याची चव चाखण्यासाठी आणखी 5 ते 7 दिवस वाट पाहावी लागणार असल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले.

रत्नागिरी आणि कर्नाटक हापूसची आवक घटली

मार्केट यार्डात रत्नागिरी आणि कर्नाटक हापूसची आवक घटत चालली आहे. रविवारी 700 ते 800 पेटी रत्नागिरी हापूसची आवक झाली. 4 ते 7 डझनाच्या तयार पेटीस 1500 ते 2000 रुपये भाव मिळाल्याचे व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले. तर, कर्नाटक हापूसच्या 4 ते 5 डझनाच्या पेटीस 800 ते 1500 रुपये भाव मिळत आहे. मागील आठवड्यात कर्नाटक येथे पाऊस झाल्याने आवक घटली आहे. त्यातही चांगल्या प्रतीच्या मालाचे प्रमाण कमी असल्याचे कर्नाटक हापूसचे व्यापारी रोहन उरसळ यांनी सांगितले.

लहरी हवामानामुळे यंदा रायवळ आंब्याचा हंगाम उशिरा सुरू झाला आहे. गेल्या वर्षी रायवळ आंब्याला सुरुवातीला डझनास 50 ते 60 रुपये भाव मिळाला होता. यंदा आंब्याला दुपटीने दर मिळाला आहे.

                                    – यशवंत कोंडे, गावरान आंब्याचे व्यापारी

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news