

पुणे: रेल्वेच्या पुणे विभागाअंतर्गत धावणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्यांमध्ये असलेल्या 'पेट व्हॅन' सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, गेल्या दोन आर्थिक वर्षात तीन हजारांपेक्षा अधिक पाळीव प्राण्यांची या सेवेमार्फत रेल्वे गाडीतून वाहतूक केली आहे. यातून रेल्वे पुणे विभागाला दहा लाखांपेक्षा अधिकचा महसूल मिळाला आहे.
आपल्या लाडक्या पाळीव प्राण्याला सोबत घेऊन प्रवास करायचा असेल, तर रेल्वेची पेट व्हॅन सेवा हा प्रवाशांसाठी अत्यंत सुरक्षित आणि सोयीचा पर्याय ठरत आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या गार्ड डब्यात असलेल्या विशेष पेट व्हॅनमार्फत कुत्रे, मांजरी, शेळ्या- मेंढ्या (बकरी) यांसारख्या पाळीव प्राण्यांची वाहतूक केली जात आहे. या सेवेला गेल्या काही वर्षांत या सेवेला प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, रेल्वेच्या उत्पन्नातही मोठी भर पडली आहे. रेल्वे पुणे विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, पुणे विभागांतर्गत पुणे, मिरज, कोल्हापूर, सातारा, कराड, दौंड आणि अहिल्यानगर या स्थानकांवरून पाळीव प्राण्यांची वाहतूक केली आहे.
कोणत्या स्थानकातून किती महसूल?
रेल्वेने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, पुणे रेल्वे स्थानक हे प्राण्यांच्या वाहतुकीत अव्वल क्रमांकावर आहे. याशिवाय मिरज स्थानकातून २०२४-२५ मध्ये २३ हजार ८० रुपये आणि २०२५-२६ मध्ये ३० हजार ३३८ रुपये महसूल मिळाला. कोल्हापूर, कराड, दौंड आणि अहिल्यानगर या स्थानकांवरूनही प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. साताऱ्यातूनही २०२५-२६ मध्ये २१० किलो वजनाच्या वाहतुकीची नोंद झाली आहे.
आकडेवारी काय सांगते?
वर्ष २०२४-२५ : या आर्थिक वर्षात पुणे विभागातून एकूण १,५७४ पाळीव प्राण्यांचे बुकिंग करण्यात आले. याद्वारे ५८ हजार ६० किलो वजनाची वाहतूक झाली असून रेल्वेला ५ लाख १५ हजार ६३६ रुपये महसूल मिळाला. यामध्ये एकट्या पुणे रेल्वे स्थानकाचा वाटा सर्वाधिक म्हणजेच ४ लाख ७५ हजार ४५४ रुपये इतका होता.
वर्ष २०२५-२६ : या वर्षात प्रतिसादात आणखी वाढ झाली. एकूण १,५७८ प्राण्यांची वाहतूक केली. एकूण वजन ५८ हजार १३६.४ किलो इतके होते आणि त्यातून रेल्वेच्या तिजोरीत ६ लाख २७ हजार १०७ रुपये महसूल जमा झाला.
वर्ष २०२६-२७ (चालू वर्ष - मे महिन्यापर्यंत) : चालू आर्थिक वर्षाच्या सुरूवातीच्या काळातच (एप्रिल ते मे २०२६) १४६ प्राण्यांचे बुकिंग झाले असून ४ हजार १७८.८८ किलो वजनाच्या वाहतुकीतून ५३ हजार ४०१ रुपये उत्पन्न रेल्वेला मिळाले आहे.
प्रवाशांना त्यांच्या पाळीव प्राण्यांसह सुरक्षित आणि त्रासमुक्त प्रवास करता यावा, यासाठी रेल्वेची पेट व्हॅन सेवा कार्यरत आहे. गेल्या दोन वर्षांतील आकडेवारी पाहता प्रवाशांचा या सुविधेला मिळणारा प्रतिसाद सातत्याने वाढत आहे. सुरक्षितता आणि पारदर्शकता यांमुळे नागरिक रेल्वेच्या या सुविधेला प्राधान्य देत आहेत. आगामी काळात प्रवाशांच्या सोयीसाठी या सेवा अधिक सुलभ करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तसेच, प्रवाशांनी प्रवासादरम्यान सोबत असलेल्या पाळीव प्राण्यांचे बुकींग करूनच प्रवास करावा, अन्यथा त्यांना रेल्वे नियमानुसार सहापट दंड भरावा लागू शकतो.
हेमंत कुमार बेहेरा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, पुणे विभाग