

पुणे: मुलाला शासकीय नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. साक्षर रोहिदास म्हस्के (वय ५८, रा. अष्टविनायक सोसायटी, फुरसुंगी, सासवड रस्ता), बाळासाहेब पाटील (वय ६२, रा. मोशी, भोसरी), अनिल अप्पासाहेब नवले (वय ६०, रा. सोलापूर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत एकाने फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मूळचे धुळे जिल्ह्यातील देवपूरचे रहिवासी आहेत. आरोपींशी त्यांची ओळख झाली होती. आरोपींनी फिर्यादीच्या मुलाला शासकीय नोकरी लावण्याचे आमिष २०२१ मध्ये दाखविले होते. त्यानंतर त्यांच्याकडून वेळोवेळी २२ लाख ४५ लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर फिर्यादीच्या मुलाला नोकरी लावली नाही.
नोकरी न लावल्याने फिर्यादीने त्यांच्याकडे विचारणा करून पैसे परत करण्यास सांगितले. तेव्हा आरोपींनी टाळाटाळ सुरू केली. आरोपींनी त्यांना सात लाख २८ हजार रुपये पाठविले. उर्वरित १५ लाख १७ हजार रुपये परत केले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.