

पुणे: लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात पुण्यातील विशेष न्यायालयात बदनामीचा खटला सुरू आहे. या प्रकरणात फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात अर्ज दाखल करून ‘राहुल गांधींना स्वतः प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश द्यावेत,’ अशी मागणी केली होती. त्याला राहुल गांधींच्या वतीने ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी न्यायालयात आपली बाजू मांडली आणि अर्जावर तीव हरकत नोंदवली.
त्यांनी स्पष्ट केले की, फिर्यादीच्या या अर्जात राहुल गांधींनी न्यायालयात हजर का राहावे? याचे कोणतेही कायदेशीर कारण किंवा कायद्याचा ठोस आधार दिलेला नाही. त्यामुळे अशा प्रकारचा अर्ज हा कायद्याच्या दृष्टीने एकतर्फी, आधारहीन व ग््रााह्य धरता येण्याजोगा नाही. भाजप व आरएसएसचे कार्यकर्ते आणि फिर्यादींसारख्या हस्तकांकडून देशभरात राहुल गांधी यांच्याविरुद्ध खोटे व आधारहीन खटले दाखल करण्याचे कटकारस्थान सुरू आहे. (Latest Pune News)
महात्मा गांधींच्या हत्येला कारणीभूत ठरलेल्या हिंसक विचारसरणीशी संबंधितांनाच आज बदनामीचा दावा करण्याचा प्रयत्न करताना पाहणे हे विडंबनात्मक असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. नथुराम गोडसे व गोपाळ गोडसे या गांधी हत्येतील आरोपींचा उल्लेख अर्जात करून त्यांचे अप्रत्यक्ष कौतुक फिर्यादींनी केले आहे. एवढेच नव्हे, तर गांधी हत्या झाल्यानंतर गोडसे कुटुंबीयांवर समाजाने बहिष्कार टाकला नव्हता, असे नमूद करून समाजाने गांधीहत्या मान्य केली होती, असे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.
ॲड. पवार यांनी न्यायालयात मागणी केली की, फिर्यादींनी प्रथम अर्ज कोणत्या कायद्यांतर्गत दाखल केला आहे, हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. त्यानंतरच राहुल गांधींच्या वतीने या अर्जाला तपशीलवार उत्तर दिले जाईल. कायद्याचा आधार नसलेल्या व लोकशाहीविरोधी विचारसरणीला पोषक अशा अर्जाला न्यायालयीन मान्यता देऊ नये, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे.