

पुणे: आकर्षक फुलांची सजावट, दिवसभर रंगलेले धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम आणि भाविकांनी कार्यक्रमांत घेतलेला उत्स्फूर्त सहभाग, असे उत्साही वातावरण सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात सोमवारी (दि. 22) पाहायला मिळाले. भाविकांनी पहिल्याच माळेला दर्शनासाठी गर्दी केली आणि आयुष्यात सुख-समृद्धी, चैतन्य नांदण्याची कामना केली.
सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिराच्या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सवात पारंपरिक पद्धतीने सांगली संस्थानचे राजे गोपालराजे पटवर्धन आणि पद्माराजे गोपालराजे पटवर्धन यांच्या हस्ते घटस्थापना झाली. धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम देखील उत्सवात आयोजित करण्यात आले आहेत. (Latest Pune News)
घटस्थापनेला ट्रस्टचे प्रमुख संस्थापक आणि विश्वस्त राजकुमार अग्रावाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रावाल, विश्वस्त ॲड. प्रताप परदेशी, डॉ. तृप्ती अग्रावाल, भरत अग्रावाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते. मंदिराला आकर्षक सजावट केली असून, त्रिशक्ती महालामध्ये देवी विराजमान झाली आहे.
‘वंदे मातरम्’च्या स्वरांतून उलगडला राष्ट्राभिमानाचा प्रवास
भारतमातेच्या स्तुती गीताचा इतिहास जिवंत करणारा ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीतावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम महालक्ष्मी मंदिराच्या सभामंडपात सादर झाला. भारतभूमीला जननी मानणाऱ्या संत, स्वातंत्र्यसेनानी आणि जनतेच्या हृदयात दरवळणाऱ्या या स्तुती गीताचा इतिहास पुणेकरांसमोर उलगडला.
निमित्त होते ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे झाल्याच्या निमित्ताने नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी आयोजित विशेष कार्यक्रमाचे. कलाकार प्रदीप फाटक, चारुलता पाटणकर, अभिषेक खेडकर यांनी कार्यक्रमाचे सादरीकरण केले. सायंकाळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते मंदिरावरील त्रिशक्ती महाल आणि विद्युतरोषणाईचे उद्घाटन झाले.
सामूहिक श्रीसूक्त पठण कार्यक्रम
नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (दि.23) सामूहिक श्रीसूक्त पठण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी साडेपाच वाजता लेखिका आणि कवयित्री सन्मान सोहळा आणि डॉ. कल्याणी हर्डीकर यांच्या जागर विश्वजननीचा या पुस्तकाचे प्रकाशन मूर्तिशास्त्र ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. मंजिरी भालेराव यांच्या हस्ते होणार आहे.