सुवर्णा चव्हाण
पुणे: नवरात्रोत्सव म्हटल्यावर दांडिया-गरबा कार्यक्रमांची धूम असणारच... यंदाही पुण्यात ठिकठिकाणी दांडिया-गरबा कार्यक्रम, महोत्सव अन् स्पर्धा आयोजित केले असून, कोरेगाव पार्क, हिंजवडी, बाणेर, बावधन, विमाननगर, खराडी, बिबवेवाडी, औंध, खडकी, शिवाजीनगर, कॅम्प आदी ठिकाणी दांडिया-गरबा कार्यक्रम रंगणार आहेत.
डीजेसह पारंपरिक दांडिया-गरबा गीतांवर थिरकण्यास तरुणाई सज्ज असून, या कार्यक्रमांना सेलिबिटींचीही उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमांचे नियोजन पुण्यातील इव्हेंट कंपन्या करीत आहेत, सजावटीपासून ते सेलिबिटी गेस्टसाठीचे नियोजन अनेक इव्हेंट कंपन्यांकडून करण्यात आले आहे. (Latest Pune News)
पुण्यात दहा दिवसांमध्ये अंदाजे 100 ते 150 कार्यक्रम रंगणार आहेत. काही कार्यक्रमांमध्ये ड्रेसकोडही ठेवण्यात आला असून, पारंपरिक गुजराती, राजस्थानी, मराठमोळ्या वेशभूषेत पुणेकर कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.
नवरात्रोत्सवाला सोमवारपासून (दि. 22) सुरुवात होत आहे. उत्सवातील रंगतदार दांडिया-गरबा कार्यक्रमही यानिमित्त अनुभवायला मिळणार असून, इव्हेंट कंपन्यांनी या कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवसापासून हे कार्यक्रम रंगणार आहेत. शहर आणि उपनगरातील लॉन्स, क्लब हाऊस, सभागृह, मैदान आदी ठिकाणी हे कार्यक्रम आयोजित केले आहेत.
कार्यक्रमांमध्ये फक्त गुजरातीच, नव्हे तर मराठीभाषकांसह इतर राज्यांतील लोकही सहभागी होणार आहेत. खासकरून आयटीतील नोकरदार तरुण-तरुणी वेळ काढून या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. साल्सा गरबा, सुरती स्टाईल, वेस्टर्न गरबा, फायर गरबा अन् बॉलिवूड गरबा आणि पारंपरिक दांडियावर तरुणाई थिरकणार आहे.
नृत्यदिग्दर्शकांना आणि दांडिया-गरबा गीते सादर करणाऱ्या कलाकारांना, वादकांना या कार्यक्रमांसाठी बोलाविण्यात आले आहे. इव्हेंट कंपन्यांकडून कार्यक्रमांचे नियोजन पूर्ण झाले असून, सेलिबिटी गेस्ट, डीजे, ऑर्केस्ट्रा समूह, नृत्यदिग्दर्शक आणि सह नृत्यकलाकार आदी सहभागी होणार आहेत.
दांडिया-गरबासाठी खास ऑर्केस्ट्रा विविध गाण्यांवर कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. कार्यक्रमांसाठी 500 ते अडीच हजार रुपयांपर्यंत तिकीट आहे. इव्हेंट कंपन्यांचे काम नवरात्रोत्सवाच्या तीन महिने आधीच सुरू झाले होते आणि आता ते अंतिम टप्प्यात आले आहे. प्रत्येक कार्यक्रमाला प्रायोजक मिळाले असून, दांडिया-गरब्याच्या ग््रुापसह सेलिबिटींच्या उपस्थितीपर्यंतचे सर्व नियोजन इव्हेंट कंपन्यांनी केले आहे.
इव्हेंट अँड एंटरटेन्मेंट मॅनेजमेंट असोसिएशनचे (इमा) सदस्य निखिल कटारिया म्हणाले की, पुण्यातही दांडिया-गरबा कार्यक्रमांचा ट्रेंड रुजत आहे. पुण्यामध्येही गेल्या काही वर्षांमध्ये कार्यक्रमांची संख्या वाढली असून, यंदाही अनेक इव्हेंट कंपन्यांनी, संस्थांनी कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. काही ठिकाणी दांडिया-गरबा महोत्सवही होणार आहेत.
इव्हेंट कंपन्यांसह लाइटमन ते नृत्यकलाकारापर्यंत सर्वांना काम मिळाले आहे. पोलिस परवानगी ते तिकीट विक्रीपर्यंत, ऑर्केस्ट्राच्या ग्रुपपासून ते लायटिंगपर्यंतचे काम टप्प्याटप्प्याने करावे लागते. इव्हेंट कंपन्यांचे ग्रुप त्यांच्या-त्यांच्या पातळीवर असे कार्यक्रम आयोजित करतात. आम्हीसुद्धा बिबवेवाडीत कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद आहे.
दांडिया-गरबा कार्यक्रमांना हटके नावे
दांडिया-गरबा कार्यक्रमांना नावेही खूप वेगळ्या पद्धतीची देण्यात आलेली आहेत. दांडिया-गरबा नाइट्स, बॉलिवूड गरबा नाइट्स, दांडिया उत्सव, नवरात्री दांडिया नाइट्स, डिस्को दांडिया... अशा नावांनी कार्यक्रम रंगणार आहेत. पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमांना अनेक गुजराती कलाकार आणि गायकांची उपस्थिती असणार आहे. त्याशिवाय सायंकाळी सात ते रात्री दहा या वेळेत हे कार्यक्रम होणार आहेत.