पुणे : रेडिएशन सेंटर कागदावरच; तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली होती घोषणा

पुणे : रेडिएशन सेंटर कागदावरच; तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली होती घोषणा

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्याचे तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुण्यासह राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये ऑन्कोलॉजी रेडिएशन सेंटर सुरू करणार असल्याचे जाहीर केले होते. वैद्यकीय महाविद्यालय नसलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये कॅथलॅब सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही टोपे यांनी केली होती. ऑगस्ट 2022 मध्ये तानाजी सावंत यांनी आरोग्य मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. मात्र, अजूनही रेडिएशन सेंटर आणि कॅथ लॅबची घोषणा केवळ कागदावरच राहिली आहे.

मुंबईतील टाटा मेमोरिअल सेंटरवरील भार कमी करण्यासाठी आणि रुग्णांची सोय व्हावी, यासाठी पुणे, जालना, रत्नागिरी आणि ठाणे येथे ऑन्कोलॉजी रेडिएशन सेंटर उभारण्याचे नियोजन होते. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. कार्डियाक कॅथ लॅब आणि ऑन्कोलॉजी रेडिएशन सेंटरच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही. याबाबत तानाजी सावंत यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

कोठे होणार कॅथ लॅब?

ठाणे, परभणी, वर्धा, रत्नागिरी, उस्मानाबाद, पनवेल, भंडारा, मालाड, मालवण, कराड, अहमदनगर, मीरा भाईंदर, धुळे, औरंगाबाद, बीड, वाशिम, हिंगोली, सिंधुदुर्ग, बुलढाणा आणि अकोला अशी ठिकाणे कार्डियाक कॅथ लॅबसाठी अंतिम केली आहेत. कॅथ लॅबमध्ये अँजिओग्राम, अँजिओप्लास्टी आणि पेसमेकर/इम्प्लांट करण्यायोग्य कार्डिओव्हर्टर-डिफिब्रिलेटर यांसह चाचण्या आणि प्रक्रिया केल्या जातात.

प्रयोगशाळांचे खासगीकरण?

कॅथ लॅब्स शासनातर्फे चालवल्या जाणार की सार्वजनिक-खासगी-भागीदारी तत्त्वावर चालवण्यास दिल्या जातील, याबाबत अद्याप राज्य शासनाचा निर्णय झालेला नाही. पीपीपी तत्त्वाला मान्यता मिळाल्यास आरोग्य विभागाचे खासगीकरणाच्या दिशेने आणखी एक पाऊल पडणार आहे. चाचण्यांच्या किमती जास्त असल्यास सामान्य रुग्णांना त्या परवडतील की नाही, याबाबत साशंकता असल्याचे आरोग्य हक्क कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

ऑन्कोलॉजी रेडिएशन सेंटरची जागा पूर्वीसारखी राहण्याची शक्यता आहे. रेडिएशन धोका व्यवस्थापनासाठी भूगर्भात बंकर बांधायचे आहेत आणि त्यासाठी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला कंत्राट दिले आहे.

 – डॉ. स्वप्नील लाळे, अतिरिक्ति संचालक, आरोग्य सेवा

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news