पिंपरीत चक्क ‘डॉग पार्क’!

पिंपरीत चक्क ‘डॉग पार्क’!
Published on
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरभरात तब्बल 200 सार्वजनिक उद्याने बांधून शहराचा बराचसा भाग हिरवळ केला आहे. त्याचा लाभ शेकडो नागरिक घेत आहेत. आता, महापालिकेने थेट पाळीव श्वानांसाठी उद्यान (डॉग पार्क) विकसित केले आहे. त्याला प्राणिप्रेमींचा प्रतिसाद लाभत आहे. राज्यातील हे एकमेव उद्यान असल्याचा दावा महापालिकेच्या अधिकार्‍यांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहर 181 चौरस किलोमीटर क्षेत्रात विस्तारले आहे. शहराची लोकसंख्या 30 लाखांवर गेली आहे. नागरिक मोठ्या हौसेने श्वान व मांजर तसेच, पक्षी पाळतात. त्याचा इतका लळा लागतो की, ते कुटुंबातील एक सदस्य होऊन जातात. अशा पाळीव श्वानांच्या सोईसाठी महापालिकेने डॉग पार्क उभारले आहे. पिंपळे सौदागर येथील स्वराज चौक येथील लिनन गार्डनच्या एका कोपर्‍यात 32 गुंठे जागेत हे पार्क बनविण्यात आले आहे. पाळीव श्वानांना मनोरंजन व खेळण्याची व्यवस्था करणे. मनुष्य व प्राणी संघर्ष कमी करणे या हेतूने महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने ही नवी संकल्पना पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीत राबविली आहे. त्याला श्वानप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या पार्कला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पिंपळे सौदागर, वाकड व हिंजवडी परिसरातील नागरिक आपले श्वान घेऊन येथे येतात. सध्या दररोज साधारणत: 30 जण आपल्या श्वानांना फिरायला घेऊन या उद्यानात येतात. सुटीच्या दिवशी शनिवारी व रविवारी ही संख्या 100 च्या पुढे जाते. पशुवैद्यकीय विभागाचे कर्मचारी देखभाल व स्वच्छतेचे काम पाहत आहेत. दरम्यान, त्या ठिकाणी श्वानांना लागणारे खाद्यपदार्थ व वस्तू विक्रीचे दुकान बनविण्याचे नियोजन आहे. त्यामार्फत या पार्कची देखभाल व निगा राखली जाणार आहे. त्यासाठी निविदाप्रक्रिया राबविण्यात येत आहे.

छोट्या व मोठ्या श्वानांसाठी वेगळी सोय

भांडण होऊ नयेत, म्हणून छोट्या व मोठ्या श्वानांसाठी वेगवेगळी व्यवस्था केली आहे. तसेच, आक्रमक श्वानांनाही वेगळे ठेवले जाते. श्वानाने विष्ठा केल्यानंतर मालकाने ती उचलून शौचालयात टाकण्याची व्यवस्था केली आहे.

वाढदिवसासाठी सेलिब्रेशन पॉईन्ट

हे पार्क 14 जानेवारीला खुले करण्यात आले आहे. या ठिकाणी छोटे व मोठे श्वान असे दोन विभाग करण्यात आले आहेत. हिरवळ निर्माण करून श्वानांना फिरण्यासाठी जॉगिंग ट्रॅक बनविण्यात आला आहे. तसेच, खेळण्यासाठी डॉग माउंड बनविण्यात आले आहेत. श्वानांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सेलिब्रेशन पॉईन्ट तयार करण्यात आला आहे. लोखंडी पत्र्यापासून श्वानांच्या आकर्षक कलाकृती लावण्यात आल्या आहेत. रंगीबेरंगी सजावट करण्यात आली आहे. तसेच, श्वानांसोबत आलेल्या नागरिकांसाठी डॉग कॅफे करण्यात आले आहेत.

काय आहे या पार्कमध्ये

  • पाळीव श्वानांना फिरण्यास पदपथ (जॉगिंग ट्रॅक)
  • हिरवळ मोकळे खेळण्यास डॉग माउंण्ड (छोट्या व मोठ्या कुत्र्यांसाठी वेगळे)
  • सेलिब्रेशन पॉईंट डॉग कॅफे

पिंपरी-चिंचवड शहरात  कुत्र्यांची संख्या

  • मोकाट व भटक्या कुत्र्यांची संख्या : 1 लाख
  • प्राळीव कुत्र्यांची संख्या : 10 हजार

महापालिकेची परवानगी

  • घेतलेले पाळीव कुत्रे : 800
  • वर्षाचा परवाना रक्कम : 75 रुपये

प्रायोगिक तत्त्वावर उभारलेले पार्क

नागरिक घरात श्वान पाळतात. दिवसभर घरात बसून श्वान चीडखोर होतात. त्यांना बाहेर मोकळ्या हवेत फिरावयास न्यावे लागते. त्यासाठी पालिकेने पिंपळे सौदागर येथे प्रायोगिक तत्त्वावर डॉग पार्क तयार केले आहे. त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांच्या मागणीनुसार आणखी सेवासुविधा निर्माण करण्याचा विचार आहे. श्वानांसाठी स्वतंत्र पार्क ही संकल्पना राबविणारी पिंपरी-चिंचवड पालिका राज्यातील एकमेव पालिका असल्याचे पशुवैद्यकीय विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितले.

नागरिकांचा प्रतिसाद वाढतोय

पिंपळे सौदागर तसेच, वाकड व हिंजवडी परिसरातील नागरिक डॉग पार्कमध्ये आपले पाळीव श्वान आणतात. तेथील सुविधांमुळे श्वानांचे मनोरंजन होते. उद्यानातील खुल्या वातावरणामुळे श्वान अधिक उत्साही होतात. या पार्कचे स्वागत केले जात असून, पाळीव श्वान असलेल्या नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी या ठिकाणी श्वानांना लागणारे खाद्यपदार्थ व साहित्य विक्रीचे दुकानाची गरज असल्याचे महापालिकेस कळविले आहे, असे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी सांगितले.

पार्कसाठी 35 लाख खर्च

एकूण 32 गुंठे जागेत तीन महिन्यांत हे डॉग पार्क बांधले आहे. त्यासाठी 35 लाखांचा खर्च झाला आहे. पार्कला सीमाभिंत बांधून आत सजावट केली आहे. त्यात विविध विभाग आहे. विष्टा टाकण्यासाठी विशिष्ट टॉयलेट तयार केले आहेत. वाढदिवस साजरे करण्यासाठी अ‍ॅम्पी थिएटरप्रमारे एक व्यासपीठ केले आहे, असे महापालिकेच्या क्रीडा व उद्यान स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता मनोज सेठिया यांनी सांगितले.

'नाहक उधळपट्टी थांबवावी'

पालिकेने उद्यानांतील सुविधा सुधारण्यावर भर देण्यापेक्षा कुत्र्यांसाठी उद्यान बनविण्याच्या संकल्पनेवर हसावे की रडावे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. शहरात कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला व बालकांचे लचके तोडण्याचे प्रकार शहरात घडले आहेत. नसबंदीवर मोठ्या प्रमाणात खर्च करूनही कुत्र्यांची संख्या आटोक्यात येत नाही. बंगल्यातील मंडळी लाखो रुपये खर्च करून कुत्री पाळतात. त्यासाठी पालिकेने डॉग पार्क बनविण्याची गरज काय आहे. प्रशासकीय राजवटीत निरर्थक कामावर भरमसाट खर्च करून उधळपट्टी करीत असल्याने पालिकेवर 550 कोटींचे कर्ज घेण्याची वेळ आली आहे. महापालिकेने उधळपट्टी थांबवून गरजेची कामे करावीत, असे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी सांगितले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news