

बारामती : पुढारी वृत्तसेवा : आलिशान मोटारीतून येत दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांपैकी एकाला सुपे पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल, मिरची पावडर आदी साहित्य जप्त करण्यात आले. अन्य चौघे मोटारीने पसार झाले. सुप्यातील (ता. बारामती) सासवड चौक परिसरात शनिवारी (दि. 10) पहाटे हा थरार घडला. गणेश चंद्रभान गायकवाड (वय 23, रा. खांडगाव, ता. संगमनेर, जि. अहमदनगर), अजित अरुण ठोसर, गोविंद ठोसर (रा. मातकुळी, ता. आष्टी, जि. बीड), सीमा रावसाहेब गायकवाड (रा. बस स्थानकामागे, जालना) व अजित ठोसर याचा अन्य एक मित्र यांचा पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये समावेश आहे. यातील गणेश गायकवाडला पोलिसांनी अटक केली असून अन्य चौघे पसार झाले आहेत. याप्रकरणी अंमलदार महादेव साळुंके यांनी सुपे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांना याबाबतची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथक तयार करत सुप्यातील सासवड चौक परिसरात छापा टाकला. तेथे एक आलिशान मोटार (एमएच 01 डीई 0037) ही उभी होती. मोटारीत चार पुरुष व एक महिला रुमालाने तोंड बांधून होते. त्यातील एकजण खाली उतरला असता पोलिसांनी त्याला पकडत झडती घेतली. त्याच्या कमरेला एक गावठी पिस्तुल मिळाली. तर पॅन्टच्या खिशामध्ये एक मोबाईल व एका प्लास्टिक पिशवीमध्ये मिरची पावडर मिळाली. तोपर्यंत मोटारीतील चालकाने मोटार चालू करून ती भरधाव पळवली. मोटार मोरगावच्या दिशेने सुसाट गेली. पोलिसांनी पकडलेला गणेश गायकवाड हा होता. इतरांची त्याने नावे सांगितली. तर एकाचे नाव त्याला सांगता आले नाही. पसार झालेल्या चौघांचा शोध पोलिस घेत आहेत.