Maza Bappa 2026: विद्यार्थ्यांच्या हातून साकारला ‘बाप्पा’; शाडू मातीच्या मूर्तींतून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

‘माझा बाप्पा २०२६’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध शाळांमध्ये १० सप्टेंबरपर्यंत शाडू मातीच्या गणेशमूर्ती कार्यशाळा
Maza Bappa 2026
Maza Bappa 2026Pudhari
Published on
Updated on

पुणे: शाडू मातीचा गोळा विद्यार्थ्यांनी हाती घेतला, कल्पनेला आकार दिला अन् पाहता पाहता विद्यार्थ्यांनी लाडक्या बाप्पाची मूर्ती साकारली... स्वतः घडविलेल्या श्री गणरायाचे रूप समोर येताच विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर उमटलेला आनंद आणि उत्साह पाहण्यासारखा होता. शाडू मातीपासून मूर्ती घडविण्याच्या या अनुभवातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेशही विद्यार्थ्यांच्या मनावर कोरला गेला. निमित्त होते पुढारी माध्यम समूह, पुणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने आयोजित 'माझा बाप्पा-२०२६' या उपक्रमाचे. उपक्रमांतर्गत कात्रज-धनकवडी येथील भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झालेल्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला अन् शाडू मातीतून श्री गणेशाची सुंदर मूर्ती साकारली.

Maza Bappa 2026
DJ Noise: उत्सवाचा आनंद घ्या; पण दुसऱ्याच्या शांततेची किंमत मोजून नव्हे!

‘माझा बाप्पा-२०२६’ या उपक्रमाची सुरुवात सोमवारी (दि. ३१) म्हणजेच संकष्ट चतुर्थीच्या दिवशी भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित कार्यशाळेने झाली. उपक्रमाच्या उद्‌घाटनावेळी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यापीठाचे सहसचिव डॉ. महादेव सगरे, पुणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वरिष्ठ अधिकारी राखी चौधरी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय प्रमुख मंचक जाधव, भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ फाइन आर्ट्‌सच्या प्राचार्या डॉ. अनुपमा पाटील, शिल्पकला विभागप्रमुख सुनील देशपांडे, प्रा. ओंकार पवार, भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका माधवी के., दैनिक ‘पुढारी’चे सरव्यवस्थापक डॉ. सुनील लोंढे, जाहिरात विभागप्रमुख संतोष गोगावले आदी उपस्थित होते.

Maza Bappa 2026
NEP 2020 Internship: राज्यातील ८ ते ९ लाख विद्यार्थ्यांना इंटर्नशिप देण्याचे मोठे आव्हान; प्राध्यापकांनाही मिळणार प्रशिक्षण

दै. ‘पुढारी’च्या पुणे आवृत्तीचे मुख्य बातमीदार सुनील कडूसकर यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी कार्यक्रमात रंगत आणली. सॉलिटर ग्रुप, गोयल गंगा ग्रुप, बढेकर ग्रुप, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यापीठ पुणे, ऑटोट्रॉनिक्स इंजिनिअरिंग प्रा. लि. आणि केले ग्रुप हे उपक्रमाचे सहप्रायोजक आहेत. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाचे अंकुर रुजावे आणि पर्यावरणरक्षक तयार व्हावेत, या उद्देशाने शाडू मातीपासून श्री गणेशमूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. उद्‌घाटनानंतर प्रत्यक्ष शाडू मातीपासून श्री गणेशमूर्ती साकारण्याच्या कार्यशाळेला सुरुवात झाली. कार्यशाळेत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी एकत्र येऊन शाडू मातीतून बाप्पाची मूर्ती साकारली.

Maza Bappa 2026
Digital Detox Campaign: ‘व्हॉट्सॲप’च्या युगात पत्रलेखनाची पुन्हा गोडी; टपाल विभागाचे ‘डिजिटल डिटॉक्स’ अभियान

सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या हाती शाडू माती देण्यात आली. कार्यशाळेतील कला शिक्षक विद्यार्थ्यांना मूर्ती कशी साकारायची, याविषयी माहिती देत होते. त्या पद्धतीने विद्यार्थी मूर्ती तयार करीत होते आणि प्रत्येक जण उत्साहाने मूर्ती साकारत होता. काही वेळानंतर प्रत्येकाने उत्कृष्टपणे मूर्ती साकारली आणि त्यांचे चेहरे आनंदले. प्रत्येकाच्या मनातले बाप्पा प्रत्यक्षात त्यांच्याच हास्ते साकारले गेल्याने मूर्ती साकारल्यानंतरचा विद्यार्थ्यांचा आनंद अन् उत्साह काही औरच होता. भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ फाइन आर्ट्‌सच्या शिल्प कला विभागाचे सुनील देशपांडे, प्रा. ओंकार पवार आणि टीमने ही कार्यशाळा घेतली. कार्यशाळेत त्यांनी शाडू मूर्तीमुळे होणार्‍या पर्यावरण संवर्धनासह विद्यार्थ्यांना पर्यावरणाची काळजी कशी घ्यायची, याविषयी माहिती दिली. शाडू मातीची श्री गणेशमूर्ती कशी तयार करावी, याची प्रात्यक्षिकेही विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली. शिक्षकांमध्येही उत्साह पाहायला मिळाला.

या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे, हा आहे. पीओपी मूर्तींमुळे होणारे संभाव्य जलप्रदूषण, नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन आणि पर्यावरणपूरक सण-उत्सवांची गरज, याविषयीही विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. कार्यशाळेत सहभागी विद्यार्थिनी सृष्टी गाडे म्हणाली की, श्री गणेश माझे आवडते दैवत आहे. स्वतःच्या हाताने बाप्पाची मूर्ती तयार करण्याची संधी मिळाल्याने खूप आनंद झाला. गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाची हानी होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे शाडू मातीच्या मूर्तीला प्राधान्य देण्याचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहचायला हवा.

विद्यार्थिनी आद्या कुलकर्णी म्हणाली की, मित्र-मैत्रिणींसोबत शाडू मातीपासून बाप्पा साकारताना खूप मजा आली आणि नवीन गोष्टी शिकायलाही मिळाल्या. स्वतः तयार केलेली मूर्ती घरी घेऊन जाऊन आई-बाबांना दाखवण्याची उत्सुकता आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपण सण-उत्सवही पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे केले पाहिजेत, हे या कार्यशाळेतून समजले.

Maza Bappa 2026
Pune PMPML Bus Accident: गणेशखिंड रस्त्यावर पीएमपीएमएल बसची सायकलला धडक; २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

विविध शाळांमध्ये रंगणार कार्यशाळा

शहरातील विविध शाळांमध्ये ‘माझा बाप्पा-२०२६’ उपक्रमांतर्गत दि. १० सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांसाठी शाडू मातीपासून श्री गणेशमूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व केवळ सांगण्यापुरते मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांना मूर्ती घडविण्याचा अनुभव देणे, हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे. भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्‌स आणि भारती विद्यापीठ स्कूल ऑफ व्हिज्युअल आर्ट्‌स यांचे उपक्रमाला विशेष सहकार्य लाभले आहे. भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्‌स, त्यांचे शिल्पकार सुनील देशपांडे आणि प्रशिक्षित २० शिल्पकार विद्यार्थी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून श्री गणेशमूर्ती घडविण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष शिकवत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मूर्तिकलेचा अनुभव मिळण्याबरोबरच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा विचारही कृतीतून समजत आहे.

शाडूच्या मातीतून गणेशमूर्ती तयार करण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांनी स्वतः अनुभवावी आणि त्यातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा विचार त्यांच्या मनात रुजावा, या उद्देशाने आम्ही या उपक्रमात सहभागी झालो आहोत. विद्यार्थ्यांनी स्वतः घडविलेल्या मूर्ती घरी नेऊन त्याच मूर्तीची प्रतिष्ठापना केली, तर पर्यावरणपूरक उत्सवाची संकल्पना कुटुंबापर्यंत पोहोचेल.श्री गणेशमूर्ती विसर्जनाची सध्याची पद्धत पर्यावरणासाठी आव्हानात्मक ठरत आहे. त्यामुळे शाडूमातीच्या मूर्तींचा वापर आणि योग्य विसर्जन पद्धती याबाबत ठोस जनजागृती होणे आवश्यक आहे.

सुनील देशपांडे, शिल्पकला विभागप्रमुख, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्‌स

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपल्या दैनंदिन सवयींमध्येही बदल करणे आवश्यक आहे. नैसर्गिक साधनांचा योग्य वापर आणि पर्यावरणपूरक जीवनशैली यांचा स्वीकार झाला पाहिजे. सण-उत्सवही त्याच दृष्टिकोनातून साजरे करणे गरजेचे आहे. ध्वनी आणि पर्यावरण प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत असताना प्रत्येकाने आपल्या पातळीवर पर्यावरणस्नेही पर्यायांचा आग्रह धरला, तर त्याचा सकारात्मक परिणाम निश्चितपणे दिसून येईल.

मंचक जाधव, विभागीय प्रमुख, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news