दिवे: पुरंदर तालुक्यातील वाटाणा प्रसिद्ध आहे. या पिकाच्या माध्यमातून दरवर्षी तालुक्यात मोठी आर्थिक उलाढाल होते. राज्यभरातील खवय्ये पुरंदरच्या गोड वाटाण्याची आवर्जून वाट पाहत असतात. या वर्षी पावसाने मे महिन्यातच दमदार हजेरी लावल्याने काही शेतकर्यांनी लवकर वाटाण्याची पेरणी केली.
त्याची तोडणी सध्या सुरू आहे. शुक्रवारी (दि. 11) रितेश वांढेकर व इतर शेतकर्यांनी ढुमेवाडीतील बाजारात वाटाणा विक्रीसाठी आणला होता. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच वाटाण्याची आवक झाल्याने खरेदीसाठी व्यापार्यांनी गर्दी केली होती. (Latest Pune News)
काही शेतकर्यांनी वाटाण्याची आगाप पेरणी केली होती. जास्त पावसाने वाटाण्याचे नुकसान झाले. शुक्रवारी वांढेकर व इतर शेतकर्यांनी वाटाणा ढुमेवाडी बाजारात विक्रीसाठी आणला होता.
हंगामात पहिल्यांदाच वाटाणा बाजारात आल्याने खरेदीसाठी व्यापार्यांनी गर्दी केली. प्रतवारीनुसार वाटाण्याला किलोला तब्बल 120 ते 150 रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळाला. पुढील काही दिवस वाटाण्याची आवक किरकोळ राहण्याची शक्यता असल्याने बाजारभाव टिकून राहतील, असा अंदाज शेतकर्यांनी व्यक्त केला.
वाटाण्याचे उत्पादन हे मध्य प्रदेश, दिल्ली परिसरात सर्वाधिक घेतले जाते. महाराष्ट्रात पारनेर आणि पुरंदर तालुक्यात वाटाण्याची पेरणी केली जाते. पुरंदरचा वाटाणा अप्रतिम चवीने राज्यात प्रसिध्द आहे. या भागात अर्कल व गोल्डन या जातीच्या वाटाण्याची पेरणी केली जाते. पुणे-मुंबई येथील बाजारपेठांत बाहेरील वाटाण्याच्या तुलनेत पुरंदरमधील वाटाण्याला जास्तीचा बाजारभाव मिळतो. फळबागांशिवाय पुरंदर तालुक्यात वाटाण्यातून मोठी उलाढाल होते. सासवड बाजारपेठेत पेण, मुंबई, सांगली, सातारा, महाड येथील व्यापारी खरेदीसाठी येत असतात.