काळू धबधब्याच्या रौद्र प्रवाहातून वाहून निघालेल्या पर्यटकाचा जीव वाचला, तरुणांनी ओढणीचीच केली दोरी
Pune Kalu Waterfall Accident
खिरेश्वर : पावसाळ्यात रौद्र रूप धारण करणाऱ्या प्रसिद्ध काळू धबधब्याच्या मुख्य प्रवाहात पाय घसरून वाहून गेलेल्या एका पर्यटकाला मृत्यूच्या दारातून परत आणण्याची थरारक घटना शुक्रवारी (दि.११) घडली. शेकडो फूट खोल दरीच्या तोंडावर अडकलेल्या या पर्यटकाला वाचवण्यासाठी जवळ दोरी नसताना, इतर पर्यटकांनी प्रसंगावधान दाखवत ओढणी आणि स्कार्फची तात्पुरती दोरी तयार केली आणि त्याचे प्राण वाचवले. या घटनेमुळे पर्यटकांची बेफिकिरी आणि प्रशासनाचे सुरक्षा उपाययोजनांकडे होणारे दुर्लक्ष हे गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आले आहेत.
नेमकं काय घडलं?
शुक्रवारी (दि.११) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. पुणे येथून हैदराबादच्या काही पर्यटकांना घेऊन आलेला एक व्यक्ती काळू नदीचा वेगवान प्रवाह ओलांडण्याचा प्रयत्न करत होता. पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाय घसरला आणि तो प्रवाहाबरोबर वाहत जाऊन पाच टप्प्यांत कोसळणाऱ्या धबधब्याच्या पहिल्या टप्प्यावर, दरीच्या अगदी कडेला अडकला. खाली नजर जाईल तिथपर्यंत खोल दरी आणि पाण्याचा प्रचंड वेग यामुळे त्याचा जीव धोक्यात आला होता
तरुणांनी दाखवले अफाट धाडस
ही परिस्थिती पाहताच अहमदनगर जिल्ह्यातून आलेल्या संतोष जाधव, उमेश रासकर, श्रीकांत आबाळे, संदीप गोरे या तरुणांनी स्थानिक तरुण तुषार मेमाणे, संदीप साबळे आणि निलेश पाचपिंड यांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. "त्याला वाचवण्यासाठी आमच्याकडे कोणतीही दोरी नव्हती. तो हुल्लडबाजी करत पाण्यात पडला होता आणि काही क्षणांत दरीत कोसळला असता," असे संतोष जाधव यांनी सांगितले. "तेव्हाच वेदांत आबाळे यांनी ओढणी आणि इतर स्कार्फ एकत्र बांधून एक मजबूत दोरी तयार केली. त्या दोरीच्या साहाय्याने आम्ही त्याला सुखरूप बाहेर काढले."
बेजबाबदार पर्यटनाचा गंभीर धोका
सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याच्या नादात अनेक पर्यटक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दरीच्या कडेला जाऊन धोकादायक पद्धतीने फोटो, सेल्फी आणि रील काढताना दिसतात. "या ठिकाणी यापूर्वीही पाय घसरून अपघात आणि मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी येथे रेलिंग लावण्याची मागणी आम्ही माध्यमातून केली होती, मात्र प्रशासनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे," असे स्थानिकांनी सांगितले.
पर्यटकांनी नियमांचे पालन करावे
सुट्टीच्या दिवशी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, या धोकादायक ठिकाणी प्रशासकीय कर्मचारी किंवा पोलीस तैनात असणे अत्यंत गरजेचे आहे. तरुणांच्या धाडसामुळे एकाचा जीव वाचला असला, तरी प्रत्येक वेळी नशीब साथ देईलच असे नाही. निसर्गाचा आनंद घेताना पर्यटकांनी नियमांचे पालन करणे आणि स्वतःच्या जीवाची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे, हेच ही घटना अधोरेखित करते.

