

पुणे: पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी शेतकर्यांकडून संमतीपत्रे देण्यास सुरुवात झाल्यानंतर आत्तापर्यंत एकूण एक हजार 46 शेतकर्यांनी 1350 एकर जागेच्या संपादनाला मान्यता दिली आहे. संमतीपत्रे देणार्या या सर्वांना परतावाही निश्चित केला आहे.
विमानतळासाठीची भूसंपादन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सोमवारपासून (दि. 25 ऑगस्ट) संमतीपत्रे स्वीकारण्यास जिल्हा प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली. संमतीपत्र सादर करण्यासाठी 21 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत संमती देणार्या शेतकर्यांना विकसित भूखंडासह चारपट मोबदलाही देण्यात येणार आहे. त्यानुसार येत्या 18 सप्टेंबरपर्यंत जागेसाठी संमतीपत्रे स्वीकारली जाणार आहेत. (Latest Pune News)
संमतीपत्रे स्वीकारण्यास सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सातही गावांतील सुमारे 760 जागामालकांनी संमतीपत्रे जिल्हा प्रशासनाकडे सादर केली होती. त्यानुसार आत्तापर्यंत एक हजार 350 एकर जागेची ही संमतीपत्रे असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. या सर्व शेतकर्यांना परतावाही निश्चित केला आहे.
पुरंदर तालुक्यातील सात गावांतील दोन हजार 673 हेक्टर जागा प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी निश्चित केली होती. मात्र, शेतकर्यांचा विरोध असल्याने भूसंपादनात क्षेत्र कमी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
त्यानुसार एक हजार 285 हेक्टर भूसंपादन करण्यात येणार आहे. विमानतळासाठी संपादित करण्यात येणार्या जागेच्या जवळपास चाळीस टक्के जागा जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात आल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.