

पुणे: राज्यात 17 आगस्टपर्यंत फार जोरदार पाऊस झाला नाही. मात्र, 18 ते 20 ऑगस्ट या तीनच दिवसांत राज्याचे चित्र बदलून गेले. तेव्हापासून सुरू झालेला पाऊस अजूनही हलक्या ते मध्यम स्वरूपात सुरूच आहे. त्यामुळे ऑगस्टअखेर राज्यात एकही जिल्हा अवर्षणग्रस्त नाही. तीन महिन्यांच्या सरासरीत कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा हे चारही विभाग पास झाले आहेत.
यंदा मे महिन्यात राज्यात 250 ते 300 मि. मी. पाऊस झाला. जूनमध्ये सरासरी 230 मि. मी. तर जुलैमध्ये 130 ते 150 मि.मी. इतका कमी पाऊस झाला. त्यापाठोपाठ ऑगस्टमध्येही कमी पावसाने महिन्याची सुरुवात झाल्याने पिकांनी मान टाकली होती. पिकांना पाणी कमी पडत होते. शेतकरी हैराण झाला होता. (Latest Pune News)
मात्र राज्यात 15 ऑगस्टपासून पावसाला प्रारंभ झाला. मान्सून प्रचंड वेगाने सक्रिय होत 18 ते 20 ऑगस्ट या तीनच दिवसांत राज्याल पावसाने झोडपून काढले. कोकण, मध्य, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार तर मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत 320 ते 350 मि. मी. पाऊस बरसला, त्यामुळे तीन महिन्यांची सरासरी तीन दिवसांत भरून निघाली