

पुणे: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी (दि. 20) पुण्यात आगमन होणार आहे. या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर सज्ज झाले आहे. महापालिका प्रशासनासह विविध सामाजिक संस्था, राजकीय प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांनी वारकर्यांच्या स्वागतासाठी आणि सेवेकरिता व्यापक नियोजन केले आहे.
ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीवरून तर तुकाराम महाराजांची पालखी देहूवरून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत पुण्यात दाखल होत आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम हे दोन्ही पालख्यांचे दर्शन घेऊन वैष्णवांचे स्वागत करणार आहेत. (Latest Pune News)
ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात, तर तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतील श्री निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्कामी राहणार आहे. दोन दिवसांच्या मुक्कामानंतर रविवारी (दि. 22) पहाटे दोन्ही पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतील.
पालखी सोहळ्यासाठी महापालिका प्रशासनासोबतच विविध सामाजिक संघटना, सार्वजनिक मंडळे, राजकीय नेते व पुणेकर नागरिकांनी तयारी केली आहे. पालखी मार्गावरील ठिकाणी स्वागत कक्ष, कमानी आणि पावसापासून संरक्षणासाठी पत्र्याचे शेड्स उभारले गेले आहेत. संगमवाडी पुलाजवळील राडारोडा हटवण्यात आला असून, रस्ते स्वच्छ करण्यात आले आहेत. पावसामुळे पाणी साचू नये म्हणून निचर्याच्या कामासाठी महापालिकेची पथके तैनात आहेत.
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरातील रस्त्यांचे झाडण, क्रॉनिक स्पॉट्सची स्वच्छता, आणि कचर्याची विल्हेवाट लावण्याचे नियोजन केले आहे. दोन हजार पोर्टेबल टॉयलेट्सची स्थापना करण्यात आली असून, दिवसातून तीन वेळा स्वच्छता करण्यात येणार आहे.
वारकर्यांच्या आरोग्यासाठी यंत्रणा सज्ज
वारकर्यांच्या आरोग्यासाठी महापालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. पालिकेतर्फे फिरते दवाखाने व मोफत आरोग्यसेवा दिली जाणार आहे. यासाठी वैद्यकीय पथक, डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट, प्रथमोपचार कर्मचारी तैनात करण्यात आले असून वारकर्यांना महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत तपासणी व उपचार देण्यात येणार आहेत. पालखी मार्गावर व विसाव्याच्या ठिकाणी औषध फवारणी करण्यात आली आहे.
पालखी मार्गाची डागडुजी
महापालिकेच्या पथ विभागाने देखील पालखीसाठी तयारी केली असून सोलापूर व सासवड रोडवरील रेलिंग्सची स्वच्छता करण्यात आली आहे. तसेच पॅचवर्क व जलसंचय रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सर्व अधिकार्यांच्या रजा व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून अग्निशामक विभागामार्फत मुक्काम शाळांची आग प्रतिबंधक तपासणी तसेच पालखी मार्गावरील झाडांच्या फांद्या छाटणीसाठी उद्यान विभागास सहकार्य केले जाणार आहे.
पालखी मुक्काम ठिकाणी विविध व्यवस्था
निवडुंगा विठोबा मंदिर व पालखी विठोबा मंदिर परिसरात मंडप, मदतकेंद्र, सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निशमन सेवा केंद्र, आरोग्य केंद्र, हरवलेल्यांसाठी मदतकेंद्र, जनजागृती केंद्र आदी व्यवस्था करण्यात आली आहे. व्यापारी व मंडळांनी देखील पत्र्याचे शेड उभारून निवार्याची व्यवस्था केली आहे.