सासवड: पुरंदर तालुक्यातील गराडे धरण 100 टक्के भरून सांडव्यातून कर्हा नदीला विसर्ग सुरू झाला आहे. धरणाची एकूण साठवणक्षमता 65.37 दशलक्ष घनफूट असून, सध्या 450 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती गराडे पाटबंधारे शाखेचे अभियंता अविनाश जगताप यांनी दिली.
मागील 10 दिवसांपासून पुरंदर किल्ला, गराडे आणि आजूबाजूच्या भागांत संततधार पावसामुळे गराडे धरण भरले आहे. यामुळे कर्हा नदीमार्गे पाणी थेट नाझरे धरणात पोहचत आहे. गुरुवारी (दि. 19) नाझरे धरणाचा पाणीसाठा 410.88 दशलक्ष घनफूट इतका झाला आहे. (Latest Pune News)
हे धरण सध्या 36 टक्के भरले आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास पुढील 10 ते 12 दिवसांत नाझरे धरण देखील पूर्णक्षमतेने भरण्याची शक्यता आहे, अशी माहिती नाझरे पाटबंधारे शाखेचे अभियंता अनिल घोडके व शाखा अधिकारी विश्वास पवार यांनी दिली.
सासवडला मार्च 2026 पर्यंत पाणीपुरवठा शक्य
‘गराडे धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे सासवड शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्च 2026 पर्यंत मिटला आहे,‘ अशी माहिती सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी दिली.
पर्जन्यमानाचा आढावा (दि. 19 जूनपर्यंत)
सासवड : 7 मिमी, जेजुरी : 4 मिमी, भिवडी : 28 मिमी, परिंचे : 3 मिमी, वाल्हे : 5 मिमी.