

पुणे: गुंतवणुकीवर मासिक अकरा ते बावीस टक्के परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत हैदराबादमधील ठगांनी एका कंपनीच्या माध्यमातून पुण्यातील तब्बल 35 जणांना आठ कोटी 54 लाख 34 हजार 880 रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
फसवणूक झालेल्यांमध्ये डॉक्टर, आयटी अभियंता आणि व्यावसायिकांचा समावेश आहे. या सर्वांनी प्रलोभनाला बळी पडून लाख आणि कोटीमध्ये पैसे ठगांच्या हवाली केले आहेत.याप्रकरणी अंकुर संजयकुमार धोका (वय 32, रा. मार्केट यार्ड) यांनी फिर्याद दिली आहे. (Latest Pune News)
त्यानुसार मार्केट यार्ड पोलिसांनी फाल्कन ग्रुप आणि कॅपिटल प्रोटेक्शन फोर्स प्रा. लि.चा व्यवस्थापकीय संचालक (एमडी) अमरदीप कुमार, संचालक अनिता कुमारी, संदीप कुमार तसेच कंपनीच्या इतर अधिकार्यांविरुद्ध फसवणूक, महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संरक्षक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 2022 ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धोका हे डॉक्टर आहेत. त्यांना फाल्कन ग्रुप आणि कॅपिटल प्रोटेक्शन फोर्स या कंपनीची आत्येभावाकडून माहिती मिळाली होती. ही कंपनी मोठ्या कंपनीच्या व्हेंडर्सना इन्व्हॉइस डिस्काउंटिंगसाठी पैशाची गरज असलेल्यांना पैसे पुरविते. त्यासाठी इच्छुक लोकांकडून गुंतवणुकीसाठी पैसे घेऊन त्या रकमेवर परतावा देते. धोका यांनी संकेतस्थळावर कंपनीची माहिती पाहिली.
त्यानुसार त्यांनी फाल्कन ग्रुपमध्ये 11 लाख रुपयांची गुंतवणूक केली. मासिक अकरा ते बावीस टक्क्यांपर्यंत गुंतवणुकीच्या या योजना होत्या. सुरुवातीला काही दिवस धोका यांना कंपनीने सांगितल्याप्रमाणे परतावा दिला. मात्र, त्यानंतर त्यांना परतावा मिळणे बंद झाले. सुरुवातीला कंपनीकडून सांगण्यात आले की, तीन महिन्यांत तुमची रक्कम परत देण्यात येईल.
परंतु, त्यानंतर देखील त्यांना पैसे परत करण्यात आले नाहीत. फिर्यादींचे काही मित्र कंपनीचे हैदराबादमधील ऑफिसमध्ये जाऊन पोहचले, त्या वेळी त्यांना कार्यालय बंद असल्याचे समजले. तसेच, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेंदर सिंग, आर्यन सिंग (सीओओ), चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर अँड पार्टनर यांच्यासह 20 जणांविरुद्ध हैदराबादमधील सायराबाद आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा दाखल आहे.
दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. धोका यांनी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज केला होता. धोका आणि त्यांच्यासह इतर 35 जणांची आर्थिक फसवणूक केल्याचे त्यांनी अर्जात म्हटले आहे. चौकशीअंती मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला आहे. गुंतवणूकदारांमध्ये कल्याणीनगर, रहाटणी, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, वाघोली, मांजरी, हडपसर, पाषाण, टिंगरेनगर परिसरातील उच्चशिक्षित व्यक्तींचा समावेश आहे.
आर्थिक गुन्हे शाखेकडे याबाबत तक्रार आली होती. त्यानुसार हा गुन्हा दाखल केला आहे. फसवणूक करणारी फाल्कन ग्रुप ही कंपनी हैदराबादमधील आहे. त्यांच्याविरुद्ध हैदराबादमध्ये तीन गुन्हे दाखल आहेत, तर मुंबईत एक गुन्हा दाखल आहे. 35 नागरिकांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले असून, आत्तापर्यंत पोलिसांनी नऊ जणांचे जबाब नोंदविले आहेत. यातील काही आरोपींना हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
- दीपाली भुजबळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा