

पुणे: श्रीराम जय राम जय जय राम...च्या जयघोषात तुळशीबाग श्रीराम मंदिरात थेट गाभाऱ्यात जाऊन प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्तीचे दर्शन पुणेकरांनी घेतले. वैकुंठ चतुर्दशीच्या निमित्ताने वर्षातून एकदा भाविकांना गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येत असल्याने मोठी गर्दी झाली. (Latest Pune News)
श्री रामजी संस्थान तुळशीबागच्या वतीने श्रीराम मंदिरात दरवर्षी वैकुंठ चतुर्दशीला आकर्षक सजावट व विद्युतरोषणाई देखील करण्यात आली. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले, विश्वस्त भरत तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले उपस्थित होते.
सन १७६१ साली स्थापन झालेल्या या देखण्या मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून गर्दी केली. पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी हे मंदिर स्थापन केले होते. त्यामुळे भाविकांनी दर्शनासोबत मंदिराची रचना पाहत आजूबाजूच्या परिसरातील मंदिरामध्ये देखील दर्शन घेतले.