पुणे : पारंपरिक वेशभूषेत मिरवणुकीत सहभागी झालेले समाजबांधव… वैविध्यपूर्ण देखाव्यांनी वेधलेले पुणेकरांचे लक्ष… लेजीमसह विविध वाद्यपथकांचे उत्कृष्ट वादन…'त्रिशला नंदन वीर की… जय बोलेा महावीर की…' अशा जयघोषाने दुमदुमलेला परिसर… अशा आनंदी आणि उत्साही वातावरणात भगवान महावीर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मिरवणूक काढण्यात आली. समाजबांधवांनी एकत्र येऊन भगवान महावीर स्वामी यांची जयंती उत्साहात साजरी केली. भगवान महावीर स्वामी यांच्या 'जन्मकल्याणक महोत्सवा'चे आयोजन केले होते. त्याचाच एक भाग म्हणून मिरवणूक काढली. श्री. जैन सामुदायिक उत्सव समितीतर्फे जैन समाजाचे चारही संप्रदाय श्री. जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघ, श्री. वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, श्री. जैन श्वेतांबर तेरापंथी सभा, श्री. दिगंबर जैन समाजाच्या वतीने भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. उत्सव समितीचे अध्यक्ष अचल जैन, उपाध्यक्ष भरत शहा, विजयकांत कोठारी, सचिव अनिल गेलडा, संपत जैन, कोषाध्यक्ष समीर जैन, प्रचारप्रमुख सतीश शहा, महावीर कटारीया आदी उपस्थित होते.
विविध सामाजिक संदेश असलेले फलक हातात घेऊन या मिरवणुकीत बांधव सहभागी झाले. सकाळी श्री. गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिर, फुलवाला चौक येथून या मिरवणुकीला सुरुवात झाली. येथून पुढे बोहरी आळी (रविवार पेठ), लक्ष्मी रस्ता, सोन्या मारुती चौक येथे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, श्रीनाथ भिमाले, प्रवीण चोरबोले आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते भगवान महावीर स्वामी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच मान्यवरांनी मिरवणुकीचे स्वागत केले. पुणे-सातारा रस्त्यावर असलेल्या आदिनाथ स्थानक येथे या मिरवणुकीचा समारोप झाला. मिरवणुकीत विविध रथांचा समावेश होता. हे चित्ररथ मिरवणुकीचे आकर्षण ठरले. मिरवणुकीची व्यवस्था जय आनंद विहार ग्रुप यांनी केली होती. तसेच यानिमित्ताने शहरात दिवसभर वैविध्यपूर्ण धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यातही समाजबांधवांनी उत्साहाने सहभाग घेतला.
हेही वाचा