उन्हाळी सुट्यांमुळे शहरातील पर्यटनस्थळे गजबजली..! | पुढारी

उन्हाळी सुट्यांमुळे शहरातील पर्यटनस्थळे गजबजली..!

कसबा पेठ : पुढारी वृत्तसेवा : सध्या शाळांच्या परीक्षा संपल्या असून, उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे आता प्रत्येक जण पर्यटनासाठी बाहेर पडत आहे. पुणे शहरातील पर्यटनस्थळे आणि धार्मिक स्थळे पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येत असतात. मागील दोन आठवड्यांपासून पर्यटकांची संख्या वाढली आहे. सध्या शहरात देशी पर्यटकांसह विदेशी पर्यटकही वाढल्याचे दिसत आहे.
लालमहाल, नानावाडा, पाताळेश्वर लेणी, शनिवारवाडा तसेच दगडूशेठ हलवाई गणपती, कसबा गणपती, जोगेश्वरी मंदिर, तुळशीबागेत रविवार (दि. 21) नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. अनेक पर्यटक सेल्फी विथ लाल महाल सोबत फोटो काढण्यात तसेच व्हिडिओ शूटिंग करण्यात गुंतलेले दिसून आले.

दिशादर्शक फलक नसल्याने पर्यटक नाराज :

शनिवारवाडा पार्किंगमध्ये प्रवेश करण्यासाठी शिवाजी रस्ता व बाजीराव रस्ता अशा दोन्ही बाजूंनी दुचाकी व चारचाकींसाठी प्रवेश करता येतो. मात्र, शिवाजी रस्त्यावरील लोखंडी गेटमधून फक्त दुचाकीच आत सोडण्यात येत होत्या. तसेच बाजीराव रस्ता गेटवरूनच दुचाकी व चारचाकी वाहनांना आत सोडण्यात येत असल्याने बाजीराव रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून आले. तसेच याबाबत दर्शनी भागात माहिती फलक, गार्ड नसल्याने गाड्या पार्क करायच्या कुठे? या गोंधळात पर्यटक शिवाजी रस्ता, बाजीराव रस्त्यावर गोंधळलेल्या अवस्थेत थांबलेले दिसत होते. त्यामुळे या शिवाजी रस्त्यावरील प्रवेशद्वारावरूनच पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता.

अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष :

शिवाजी रस्त्यावरील शनिवारवाडा मुख्य प्रवेशद्वार परिसरात तसेच शिवाजी रस्त्यावरील फूटपाथवर अतिक्रमण विभागाच्या दुर्लक्षामुळे दिवसेंदिवस खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या गाड्यांमध्ये वाढ होत चालली आहे. कारवाई झाली तर ती नाममात्र असते. दुसर्‍या दिवशी परत त्या जागी खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या गाड्या दिसून येतात.

हेही वाचा

Back to top button