

पुणे: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा अखेरचा रविवार साधत जिल्ह्यातील सर्वच उमेदवारांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेत गट-गण अक्षरशः पिंजून काढले. मतदारांशी थेट संवाद साधत आपापली वचननामे दिली आणि पुढील पाच वर्षे प्रामाणिकपणे काम करण्याचे आश्वासनही दिले.
तब्बल आठ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी निवडणूक होत असल्याने यंदा प्रचंड चुरस पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या 73 जागांसाठी 299, तर पंचायत समितीच्या 146 गणांसाठी 528 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 7 फेबुवारी रोजी मतदान होणार असून, 5 फेबुवारीला जाहीर प्रचाराची सांगता होणार असल्याने हा रविवारचा प्रचार उमेदवारांसाठी ’सुपर संडे’ ठरला.
राष्ट्रवादी काँग््रेासकडून जिल्हाभरात टेम्पोवर एलईडी स्क्रीन लावून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एआयआधारित व्हिडीओच्या माध्यमातून प्रचार करण्यात येत आहे. प्रामुख्याने प्रत्येक मतदारापर्यंत पोहचून पत्रके देण्यावर भर देण्यात आला असून, गाजावाजा न करता थेट संपर्कावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. दुसरीकडे, भाजपने दुखवट्यानंतर जाहीर प्रचाराला सुरुवात केली आहे. रविवारपासून उमेदवारांच्या प्रचारासाठी एलईडी स्क्रीन असलेले टेम्पो विविध ठिकाणी लावण्यात आले. कार्यकर्त्यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटीगाठी घेतल्या.
पुढील काही दिवसांत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, ग््राामविकासमंत्री जयकुमार गोरे आणि पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांनी दिली.
शिवसेना, काँग््रेास तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षांकडून वैयक्तिक गाठीभेटींवर अधिक भर देण्यात आला. सुटीचा दिवस असल्याने उमेदवार व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त गण-गटांमध्ये जाऊन घरोघरी प्रचार केला. मतदारांशी थेट संवाद, स्थानिक प्रश्नांवर चर्चा आणि विकासाची आश्वासने देत रविवारचा दिवस राजकीय हालचालींनी गजबजलेला होता. प्रचारासाठी केवळ 4 दिवसांचा अवधी उरला आहे. त्यामुळे आता जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवार प्रयत्न करणार आगेत.