

पुणे: जिल्हा परिषदेच्या 73 गट आणि 146 गणांची अंतिम प्रभागरचना जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी प्रसिद्ध केली. ही रचना जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयांच्या फलकांवर लावण्यात आली आहे.
गेल्या निवडणुकीच्या तुलनेत गट आणि गणांची संख्या कमी झाल्यामुळे आता आरक्षणदेखील नव्याने निश्चित करावे लागेल. यावर अंतिम निर्णय ग्रामविकास विभाग आणि राज्य निवडणूक आयोग घेतील. याबाबत कोणतीही कालमर्यादा निश्चित नसल्याने आरक्षण जाहीर झाल्यावर पुढील कार्यवाही केली जाईल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (Latest Pune News)
हरकतींवर सुनावणी आणि अंतिम मान्यता
जिल्हा परिषदेच्या 73 गट आणि पंचायत समितीच्या 146 गणांच्या रचनेचा प्रारूप आराखडा 14 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यावर 21 जुलैपर्यंत हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या.
या मुदतीत एकूण 217 हरकती दाखल झाल्या. या हरकतींवर संबंधित तहसीलदार आणि प्रांताधिकार्यांकडून अभिप्राय मागविण्यात आले. त्यानंतर विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सुनावणी घेऊन 115 हरकती आणि सूचना मान्य केल्या. विभागीय आयुक्तांनी सुचविलेले बदल करून सुधारित आराखडा पुन्हा त्यांच्याकडे पाठविण्यात आला. आयुक्तांनी हे बदल तपासल्यानंतर प्रभागरचनेला अंतिम मान्यता दिली, त्यानुसार ही रचना प्रसिद्ध झाली आहे.
मागील आणि आताच्या रचनेतील फरक
मागील निवडणुकीत जिल्हा परिषदेत 75 गट आणि 150 गण होते. यंदा मात्र दोन गट आणि चार गण कमी झाले आहेत. त्यामुळे आरक्षणातही बदल होणार आहेत. प्रत्येक गट आणि गणाची लोकसंख्या विचारात घेऊन आरक्षण निश्चित केले जाईल. अंतिम आरक्षण जाहीर झाल्यावर सोडत पद्धतीने ते लागू करण्यात येईल. मात्र, यासाठी कोणतीही निश्चित वेळमर्यादा नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ही प्रभागरचना संकेतस्थळावरही उपलब्ध आह