पुणे: जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा करप्रणालीत महत्त्वपूर्ण बदल करण्यास राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटाने मान्यता दिल्याने श्रीमंताचा मेवा समजला जाणारा सुकामेवाही आत्ता सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार आहे.
कररचनेतील बदलामुळे सुकामेव्याच्या भावात शंभर रुपयांमागे सात रुपयांनी स्वस्त होणार आहे. त्यामुळे, सुकामेव्याच्या भावात किलोमागे तब्बल 21 ते 84 रुपयांची स्वस्ताई येणार आहे. (Latest Pune News)
अमेरिकेने टॅरिफ वाढविण्याच्या निर्णयामुळे भारतात आयात होणार्या उत्पादनांची जीएसटी वाढणार होती. मात्र, केंद्र सरकारने प्रत्युत्तर देत जीएसटी 12 टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर आणण्याचा प्रस्ताव ठेवला.
या निर्णयामुळे अमेरिकेने वाढविलेल्या टॅरिफचा भारतीय बाजारपेठेवर काही परिणाम होणार नाही. या निर्णयामुळे सुकामेव्याच्या किंमतीवर सात टक्क्यांनी फरक पडणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारेल, अशी माहिती सुकामेव्याचे व्यापारी नवीन जिंदल यांनी दिली.
या देशांतून होते सुकामेव्याची आयात
बदाम : कॅलिफोर्निया , ऑस्ट्रेलिया. मॉमेरोन बदाम : इराण. पिस्ता : इराण, इराक. खारा पिस्ता : इराण, अमेरिका, कॅलिफॉर्निया
अक्रोड : अमेरिका, चीली. अंजीर : इराण, अफगाणिस्तान.
आरोग्याबाबत होत असलेल्या जनजागृतीमुळे प्रत्येकाच्या दैनंदिन आहारात खजुरापासून बदामपर्यंत सर्व सुकामेव्याचा समावेश असतो. या सर्व गोष्टी मोठ्या प्रमाणात परदेशातून आयात होतात. यापूर्वी श्रीमंतांचे खाद्य असलेला सुकामेवा सर्वसामान्य व गरीबांच्या आवाक्याबाहेर होता. मात्र, केंद्र सरकारने सुकामेव्याच्या जीएसटीत कपात करण्याचा निर्णय घेतल्याचा त्याचा मोठा परिणाम सुकामेव्याच्या दरावर होणार आहे. येत्या काळात सुकामेवा स्वस्त होऊन सर्वांच्याच आवाक्यात येणार आहे.
- राजेंद्र बाठिया, माजी अध्यक्ष, दि पूना मर्चंटस् चेंबर.