पुणे : बिबट्याच्या हल्ल्यात तरुण ठार

पुणे : बिबट्याच्या हल्ल्यात तरुण ठार

पिंपरखेड, पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील जांबूत येथे सचिन बाळू जोरी (वय ३८) या तरुणाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने जांबूत परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. सचिन जोरी हा गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता होता. यासंदर्भात शिरूर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

गुरुवारी (दि. १) काही तरुणांना सचिनचे कपडे व चपला जांबूत-वडनेर खुर्द रस्त्याच्या कडेला आढळून आले. त्यामुळे त्यांनी शेजारी असणाऱ्या उसाच्या शेतात शोधाशोध केली असता फरफट आणि बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या. यावेळी शोध घेत असताना उसाच्या सरीत स्थानिक तरुणांना सचिन जोरीचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच वनविभाग, पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, डॉ. प्रियंका घुगे यांनी पंचनामा करून पुढील तपासणीसाठी मृतदेहाचे नमुने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले आहेत.

संबंधित मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत असून, प्राथमिक तपासासाठी मृतदेहाचे नमुने घेण्यात येणार आहेत आणि त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील माहिती देण्यात येईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी सांगितले. दरम्यान, बिबट्याने मनुष्यावर हल्ला करून ठार मारल्याची गावातील ही दुसरी घटना आहे. तीन वर्षांपूर्वी एका लहान बालकावर बिबट्याने अशाच प्रकारे हल्ला करून ठार केले होते.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news