

पुणे: पुणे शहरातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याचे दिसून येते. १ जानेवारी २०२४ ते ७ ऑगस्ट २०२६ या अडीच वर्षांच्या कालावधीत बलात्कार आणि विनयभंगाचे मिळून ३ हजार ६७५ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये बलात्काराचे (लैंगिक अत्याचाराचे) १ हजार ३७९, तर विनयभंगाचे २ हजार २९६ गुन्हे आहेत. त्यामुळे 'स्मार्ट सिटी'त 'महिलांची सुरक्षा अंधारात' असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
दरम्यान, गुन्ह्यांची नोंद वाढणे हे काही वेळा तक्रार नोंदविण्याच्या प्रक्रियेत झालेल्या सुधारणेचेही निदर्शक असू शकते. त्यामुळे केवळ आकडे वाढले म्हणून पोलिस यंत्रणा अपयशी ठरली, असा थेट निष्कर्ष काढता येत नाही.
मात्र, ३ हजार ६७५ गुन्ह्यांची एकत्रित संख्या महिला सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी निश्चितच गंभीर संकेत असल्याचे बोलले जाते. तसेच, महिलावरील लैंगिक अत्याचाराचे हे आकडे जरी मोठे असले तरी यातील अनेक गुन्हे हे तांत्रिक असल्याचे देखील निदर्शनास येते. त्यामुळे भविष्यात या प्रकरणात न्यायालयीन खटले चालले तरी आरोपींना शिक्षा मात्र होत नसल्याचे तज्ज्ञ सांगतात.
दिवसेंदिवस पुणे शहराचा झपाट्याने विस्तार होतो आहे. तसेच, गुन्हेगारी देखील वाढीस लागली आहे. त्यातच आता महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात देखील वाढ होत असल्याचे पोलिसदप्तरी दाखल असलेल्या आकडेवारीवरून निदर्शनास आले आहे.
महिलांवरील अत्याचाराची ही आकडेवारी केवळ गुन्ह्यांची संख्या दर्शवत नाही; तर शहरातील महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज अधोरेखित करते. विशेषतः सार्वजनिक ठिकाणे, शैक्षणिक परिसर, वाहतूक केंद्रे आणि रात्रीच्या वेळी महिलांच्या सुरक्षिततेकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरातील महिलाच्या सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेली ठिकाणे देखील शोधून काढली. त्या ठिकाणी दिवसा आणि रात्रीची गस्त वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बलात्काराचे गुन्हे वाढले
२०२४ मध्ये पुणे शहरात बलात्काराचे ५१४ गुन्हे दाखल झाले. २०२५ मध्ये हा आकडा वाढून ५२९ झाला. तर २०२६ मध्ये ७ ऑगस्टपर्यंतच ३३६ गुन्हे दाखल झाले आहेत. २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये १५, तर विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये ४७ ने वाढ झाली.
विनयभंगाचे २,२९६ गुन्हे
महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये विनयभंगाच्या घटनांची संख्या बलात्काराच्या तुलनेत लक्षणीयरीत्या अधिक आहे. २०२४ मध्ये ८५७, २०२५ मध्ये ९०४ आणि ७ ऑगस्ट २०२६ पर्यंत ५३५ गुन्हे दाखल झाले आहेत. तीन कालखंडांतील एकत्रित संख्या २ हजार २९६ आहे. मात्र, यातील अनेक गुन्हे हे तांत्रिक असल्याचे देखील दिसते.