

पुणे: प्रेमाच्या आमिषाने तरुणीला पुण्यात आणून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असताना तिच्या बचतीची रक्कम आणि दागिने स्वतःच्या फायद्यासाठी वापरणे, व्यसनासाठी पैशांची मागणी करत वारंवार मारहाण व मानसिक छळ केल्याने झालेल्या २५ वर्षीय तरुणीने सुसाईड नोट लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही धक्कादायक घटना आंबेगाव पठारमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मनीषा महादू गांडले (वय २५) असे मृत तरुणीचे नाव असून, तिच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून साहिल मनोज आडसूळ (वय २८, रा. गजानन कॉलनी, साईसिद्धी चौकाजवळ, आंबेगाव पठार) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना २७ जून रोजी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल आडसूळ याने २०२२ मध्ये मनिषाला प्रेमाचे आश्वासन देत पुण्यात आणले. त्यानंतर दोघे आंबेगाव पठार येथे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.
या काळात त्याने मनीषाकडील बचतीची रक्कम आणि सोन्याचे दागिने स्वतःच्या उपयोगासाठी खर्च केले. पुढे व्यसनासाठी वारंवार पैशांची मागणी करू लागला. पैसे देण्यास नकार दिल्यास तिचा शारीरिक व मानसिक छळ करून मारहाण केली.
या सततच्या त्रासाला आणि प्रेमातील फसवणुकीला कंटाळून मनीषाने सुसाईड नोट लिहून राहत्या घरात गळफास घेत जीवन संपविले. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत तिने होत असलेल्या छळाचा उल्लेख केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक डोईफोडे करीत आहेत.