Pune Bus Attack : हल्ला दुसऱ्यावर, पण 'तिचा' हाकनाक बळी; जीव वाचवण्याची धडपडच ठरली जीवघेणी

एसटीतील 'त्या' कोयताधारी युवकामुळे महिला मुकली जिवाला
Pune Bus Attack
एसटीतील 'त्या' कोयताधारी युवकामुळे महिला जिवाला मुकली
Published on
Updated on

बारामती : बारामती-वालचंदनगर एसटी बसमध्ये काही दिवसांपूर्वी माथेफिरू तरुणाने अचानक कोयत्याने दुसऱ्या तरुणावर हल्ला केला होता. यामुळे भयभीत होऊन जीव वाचविण्यासाठी पळत असताना अचानक जमिनीवर कोसळून बारामती येथील वर्षा रामचंद्र भोसले (वय ४३, रा. यादगार सिटी, बारामती) गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा बुधवारी (दि.६) मृत्यू झाला.

काटेवाडी (ता. बारामती) येथे दि. ३१ जुलै रोजी बारामती-वालचंदनगर बसमधून वर्षा भोसले या वालचंदनगर या त्यांच्या माहेरी निघाल्या होत्या. या बसमध्ये मागील सीटवर बसलेल्या अविनाश शिवाजी सागर (वय २१, मूळ रा. लातूर; सध्या रा. सोनगाव, ता. बारामती) याने अचानक शेजारच्या सीटवर बसलेल्या पवन अनिल गायकवाड या तरुणावर कोयत्याने वार केले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बसमध्ये असलेले प्रवासी भयभीत झाले. यामध्ये वर्षा भोसले यांच्यासह इतर महिला व विद्यार्थिनीदेखील मोठ्या संख्येने होत्या. त्यादेखील भयभीत झाल्या.

Pune Bus Attack
Pune News: तीनवेळा कपडे बदलूनही पोलिसी नजरेतून सुटला नाही

काही प्रवाशांनी चालू बसमधून मागच्या बाजूने उड्या मारल्या. प्रसंगावधान राखून चालकाने बस काटेवाडी येथील उड्डाणपुलावर थांबवली. यावेळी पवन गायकवाड हा जीव वाचविण्यासाठी पळाला. त्याच्यासह अन्य प्रवाशांमागे आरोपी अविनाश सगर हा माथेफिरू पळू लागला. दरम्यान, वर्षा भोसले यादेखील स्वतःचा जीव वाचविण्यासाठी पळाल्या. त्याचवेळी त्या जमिनीवर जोरदार कोसळल्या, यामध्ये त्या गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाल्या. त्यांच्या मेंदूत मोठा रक्तस्राव झाला. घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर पवन गायकवाड या तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमी झालेल्या वर्षा भोसले यांना पोलिसांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, त्यांच्या कुटुंबीयांना ओळखपत्राच्या आधारे संपर्क साधून बोलाविण्यात आले. वर्षा भोसले यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीपासूनच त्या बेशुद्धावस्थेत होत्या. सलग पाच दिवस मृत्यूशी त्या झुंज देत होत्या. त्यांना वाचविण्यासाठी डॉक्टरांनी मोठे प्रयत्न केले; मात्र बुधवारी (दि. ६) त्यांची प्राणज्योत मालवली.

वर्षा या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाणेवाडी (ता. बारामती) येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्रा. रामचंद्र भोसले यांच्या पत्नी होत. मूळचे इंदापूर तालुक्यातील काटी येथील रहिवासी असलेले भोसले कुटुंब बारामती शहरातील यादगार सिटी या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. माथेफिरू तरुणाने एका युवकावर बसमध्ये अचानक केलेल्या हल्ल्यामुळे हकनाक वर्षा भोसले यांचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Pune Bus Attack
Pune Crime: डोक्यात लोखंडी पहार घालून मित्राचा खून; माहिती देणाराच निघाला आरोप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news