

पुणे : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने अधिकृत घोषणा केली असून, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे.
उमेदवारी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांना महापालिकेच्या विविध विभागांकडे कोणतीही थकबाकी नसल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) सादर करणे आवश्यक आहे.
या प्रक्रियेसाठी पुणे महापालिकेच्या वतीने 'एक खिडकी' योजना सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी सावरकर भवन, पहिला मजला येथे स्थापन करण्यात आलेल्या ना-हरकत प्रमाणपत्र कक्षामध्ये अर्ज करावा. हा 'एक खिडकी कक्ष' सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत कार्यरत राहणार आहे. याशिवाय, ना-हरकत प्रमाणपत्रासाठी महापालिकेने स्वतंत्र संगणकप्रणाली विकसित केली असून, nocelection.pmc.gov.in या ऑनलाइन लिंकवरून इच्छुक उमेदवारांना नोंदणी करता येणार आहे.
नोंदणी करताना आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र तसेच मिळकत क्रमांक अपलोड करणे आवश्यक राहणार आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करता येईल. महत्त्वाचे म्हणजे, हे ना-हरकत प्रमाणपत्र कार्यालय २० डिसेंबरपर्यंत सर्व साप्ताहिक व सार्वजनिक सुटीच्या दिवशीही खुले राहणार आहे. उपायुक्त तथा कक्षप्रमुख रवी पवार यांनी ही माहिती दिली.