

पुणे: शहरात दररोज 100 किलोपेक्षा अधिक ओला कचरा निर्माण करणाऱ्या संस्था, हॉटेल्स, मंगल कार्यालये आणि गृहनिर्माण सोसायट्यांना स्वतःच्या परिसरातच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक असताना अनेक ठिकाणी हे नियम पायदळी तुडविले जात असल्याचे उघड झाले आहे. अशा सोसायट्यांची पाहणी करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी दिली.
शहरात सुमारे 1 हजार 942 बल्क वेस्ट जनरेटर आहेत. बांधकाम नियमावलीनुसार, दररोज 100 किलोपेक्षा अधिक ओला कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांनी स्वतःच त्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.
या संस्थांकडून दररोज सुमारे 20 टनांहून अधिक ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया होणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी प्रकल्प बंद असल्याने हा कचरा महापालिकेच्या यंत्रणेकडे किंवा इतरत्र टाकला जात असल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून विविध सोसायट्या आणि आस्थापनांची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत 600 पेक्षा अधिक प्रकल्प बंद असल्याचे स्पष्ट झाले होते.
नायर यांच्याकडे घनकचरा विभागाची सूत्रे आल्यावर त्यांनी शहरातील संबंधित सोसायट्या आणि संस्थांमधील कचरा प्रकल्पावर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. येथील कचरा प्रकल्प सुरू आहेत की नाही, याची पाहणी केली जाणार आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर पुन्हा कारवाई मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.