

पुणे: पुणे शहर आणि उपनगरांमध्ये पुढील काही दिवस मान्सूनपूर्व वातावरण सक्रिय राहण्याची शक्यता असून, 9 जूनपर्यंत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
दरम्यान तापमानात किंचित घट झाली असली तरी हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास कायम जाणवत आहे. बुधवारी शहरातील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 24.4 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
पाषाण येथे सर्वाधिक 38 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. लोहगाव आणि चिंचवड येथे 37 अंश, तर लवळे आणि एनडीए परिसरात अनुक्रमे 36 अंश कमाल तापमान नोंदले गेले.
किमान तापमानातही काही प्रमाणात घट झाली असून, लवळे येथे सर्वांत कमी 21.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
दुपारनंतर काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.