

पुणे: कोंढवा येथील समतानगर भागात पुणे महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी धीरज मोहन बैद यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणाची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने गंभीर दखल घेतली असून, जिल्हाधिकारी, पुणे पोलिस आयुक्त, पुणे महानगरपालिका आयुक्त; तसेच आयुक्त समाज कल्याण विभाग यांना नोटीस बजावून सदर प्रकरणाबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
पीडित सफाई कर्मचाऱ्यास तत्काळ न्याय मिळावा, तसेच दोषी व्यक्तींविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी डॉ. दिव्या सागर चरण, सदस्य, तक्रार निवारण समिती, ससून सर्वोपचार रुग्णालय व बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, महाराष्ट्र शासन यांनी संबंधित केंद्रीय प्राधिकरणांकडे तक्रार सादर केली होती.
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे सादर केलेल्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे की, पीडित व्यक्ती अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याने आरोपींविरुद्ध अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, 1989 तसेच नागरी हक्क संरक्षण अधिनियम, 1955 अंतर्गत लागू असलेल्या सर्व संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदवून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
तसेच, या प्रकरणाचा निष्पक्ष व सखोल तपास करून पीडित सफाई कर्मचाऱ्यास कायद्यानुसार संरक्षण, न्याय तसेच आवश्यक आर्थिक साहाय्य व भरपाई प्रदान करण्याबाबत संबंधित प्रशासनास निर्देश देण्यात यावेत, अशी विनंतीही केली आहे. सदर तक्रार ॲड. सागर रतन चरण, सदस्य, जिल्हा दक्षता व देखरेख समिती तथा वरिष्ठ विधिज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग व राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे सादर केली आहे.
तसेच, पीडित कर्मचाऱ्यास आवश्यक कायदेशीर सहाय्य व प्रतिनिधित्व उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या सन्मान, सुरक्षितता व मानवी हक्कांच्या संरक्षणाच्या दृष्टीने दोषींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली असून संबंधित यंत्रणांना तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले आहेत.