Pune Water Shortage: पाणीगळती, चोरी करणाऱ्यांची खैर नाही! पाणीटंचाईवर महापौर मंजूषा नागपुरे 'ॲक्शन मोड'वर, कठोर कारवाईचे आदेश

१५ क्षेत्रीय कार्यालयांत नियंत्रण कक्ष, तीन दिवसांत कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश
Mayor Manjusha Nagpure
Mayor Manjusha NagpurePudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: शहरातील पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन महापौर मंजूषा नागपुरे यांनी पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थापनाबाबत महापालिका प्रशासनाला धारेवर धरत पाणीगळती, अनधिकृत नळजोडण्या आणि पाणीचोरी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

पाण्याचा अपव्यय रोखण्यापासून ते टँकरच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यापर्यंतच्या उपाययोजना तातडीने राबवण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

शहरातील सर्व १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्वतंत्र 'पाणीटंचाई व आपत्ती नियंत्रण कक्ष' स्थापन करून ते २४ तास कार्यरत ठेवण्याचे निर्देश देतानाच, केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल तीन दिवसांत महापौर कार्यालयाकडे सादर करण्यास सांगितले आहे.

शहरातील मुख्य जलवाहिन्या, वितरण वाहिन्या आणि पाण्याच्या टाक्यांमधील गळती शोधण्यासाठी विशेष पथके नियुक्त करून दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनधिकृत नळजोडण्या तसेच व्यावसायिक वापरासाठी होणारी पाणीचोरी शोधून संबंधित जोडण्या तोडाव्‍या. दोषींवर कायदेशीर कारवाई करून दंडही आकारावा, असे निर्देश दिले आहेत.

Mayor Manjusha Nagpure
Pune Water Saving Rules: पाणी वाया घालवल्यास दंड; तिसऱ्या उल्लंघनावर गुन्हा

प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात २४ तास नियंत्रण कक्ष महापालिकेच्या सर्व १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पाणीटंचाई व आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहेत. या कक्षांमध्ये पाणीपुरवठा, आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांचे अधिकारी व कर्मचारी विविध पाळ्यांमध्ये चोवीस तास कार्यरत राहतील.

Mayor Manjusha Nagpure
Pune Water Supply: दिवाळीत गुरुवारची पाणीकपात शिथिल होणार; स्थायी समितीची मान्यतानगरसेवक सुहास टिंगरे यांच्या मागणीला यश

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन आणि व्हॉट्सॲप यंत्रणा सुरू करण्याची सूचना करण्यात आली आहे. पाणीगळती, टँकरची मागणी आणि पाणीपुरवठ्याशी संबंधित तक्रारी २४ तासांत सोडवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

गाड्या धुणे, लॉनला पाणी देण्यावर निर्बंध

पिण्याच्या पाण्याचा वापर गाड्या धुणे, खासगी बांधकामे, स्विमिंग पूल, बागा आणि लॉनला पाणी देणे तसेच रस्ते धुणे यांसारख्या कामांसाठी करण्यास बंदी घालण्याची सूचना महापौरांनी केली आहे. या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. आवश्यकतेनुसार संबंधितांची नळजोडणीही खंडित करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

टँकरच्या दरांवर नियंत्रण; काळाबाजार रोखणार

पाणीटंचाईच्या काळात टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यात पारदर्शकता ठेवून नागरिकांची आर्थिक लूट रोखण्यावर भर देण्यात आला. टँकर व्यवस्थापनावर क्षेत्रीय कार्यालयांतील नियंत्रण कक्षाचे नियंत्रण असावे, अशी महापौरांची भूमिका आहे. टंचाईग्रस्त भागांत महापालिकेमार्फत मोफत टँकर उपलब्ध करून देण्यासह खासगी टँकरच्या दरांवर कठोर मर्यादा लागू कराव्यात. पाण्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.

शहरातील सर्व भागांना समान पाणीवाटप

उपलब्ध जलसाठ्याचा आढावा घेऊन शहरासाठी टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहराच्या शेवटच्या टोकावरील भागांनाही पुरेसे पाणी मिळावे आणि कोणत्याही भागावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्यास प्रशासनाला सांगण्यात आले आहे. उपलब्ध पाण्याचे समान वाटप करून नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.