

प्रसाद जगताप
पुणे: निसर्गाचे विहंगम दृश्य न्याहाळत रेल्वेप्रवासाचा आनंद देणाऱ्या व्हिस्टाडोम कोचला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पुणे विभागातून सुटणाऱ्या चार प्रमुख रेल्वेगाड्यांमधील व्हिस्टाडोम कोचला मागील आर्थिक वर्षात प्रवाशांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे मध्य रेल्वेच्या तिजोरीत तब्बल 6 कोटी 93 लाख 6 हजार 84 रुपयांचा महसूल जमा झाला आहे.
1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत 61 हजारांहून अधिक प्रवाशांनी या आलिशान कोचमधून प्रवासाचा आनंद लुटला. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंतकुमार बेहेरा यांनी दै. ‘पुढारी’ला दिलेल्या माहितीतून हा यशाचा आलेख समोर आला आहे.
पुणे विभागातील डेक्कन एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन आणि प्रगती एक्स्प्रेस या चार गाड्यांना व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आले आहेत. घाटमाथ्यावरील सौंदर्य, बोगदे आणि धबधबे जवळून अनुभवण्यासाठी पर्यटक आणि नियमित प्रवाशांची या कोचसाठी पहिली पसंती असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
प्रवासी व उत्पन्नाबाबत अव्वल ठरलेल्या गाड्या
प्रवासीसंख्येत प्रगती एक्स्प्रेसने बाजी मारली असून, वर्षभरात सर्वाधिक 16 हजार 327 प्रवाशांनी यातून प्रवास केला. मात्र, उत्पन्नाबाबतीत शताब्दी एक्स्प्रेसने इतर गाड्यांना मागे टाकत तब्बल 2 कोटी 92 लाख रुपयांची घसघशीत कमाई रेल्वेला करून दिली आहे.
पुणे-मुंबई मार्गावरील बोरघाटाचे सौंदर्य प्रवाशांना आकर्षित करते. व्हिस्टाडोम कोचच्या फिरत्या खुर्च्या आणि काचेचे छत, काचेच्याच भव्य खिडक्या, यामुळे हा प्रवास अधिक आनंददायी होतो. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता, हा रेल्वेचा एक यशस्वी प्रयोग ठरला आहे.
हेमंतकुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग