Pune Ward Vote Counting: विश्रांतवाडीत मतमोजणीवेळी उत्कंठा, जल्लोष आणि निराशेचे नाट्य
पुणे/विश्रांतवाडी: उमेदवार आणि कार्यकर्त्यांची फेरीगणिक वाढणारी धाकधूक अन् त्यांच्या चेहऱ्यावरील बदलणारे हावभाव... कुठे वाढलेल्या मतांचा उत्साह, तर कुठे पिछाडीवर पडल्यामुळे हिरमुसलेले चेहरे... पराभवाची चाहूल लागताच मतमोजणी केंद्राबाहेर पडणारे उमेदवार... तर विजय उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून होणारा जल्लोष, घोषणाबाजी अन् गुलालाची उधळण...अशा वातावरणात येरवडा- कळस-धानोरी या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक १, २ व ६ ची मतमोजणी कै. राजाराम भिकू पठारे स्टेडियममध्ये पार पडली.
शुक्रवारी (दि.१६) सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. या वेळी स्टेडियम बाहेर शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. एकावेळी एकाच प्रभागाची मतमोजणी होत असल्याने इतर प्रभागातील कार्यकर्त्यांना आत जाऊ दिले जात नव्हते. मतमोजणी केंद्राच्या परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. उमेदवार आणि कार्यकर्त्यांना मतमोजणी केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई होती. त्यामुळे आतमध्ये काय चाले आहे हे बाहेर उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांना समजत नव्हते. मात्र, प्रत्येक फेरीनंतर लाऊड स्पीकरवर केल्या जाणाऱ्या मतसंख्येच्या घोषणेनंतर विजयाकडे कूच करणाऱ्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जात होता अन् घोषणा दिल्या जात होत्या.
तिसऱ्या फेरीनंतर खूपच मागे पडलेल्या उमेदवारांच्या चेहऱ्यांवर नाराजी दिसत होती आणि ते मतदान केंद्राबाहेर पडत होते. संध्याकाळी पाचनंतर विजयी उमेदवार प्रमाणपत्र घेण्यासाठी येऊ लागले होते. त्यांच्याबरोबर आलेले कार्यकर्ते गुलालाची उधळण करीत जल्लोष करीत होते. प्रभाग क्रमांक ६ ची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर सर्व विजयी उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर यांच्याकडून प्रमाणपत्र देण्यात आले. मतमोजणी केंद्राच्या परिसराला अक्षरशः जत्रेचे स्वरूप आले होते. रस्त्याच्या कडेला वाहने लावायलाही जागा शिल्लक राहिली नव्हती.
दुबार मतमोजणीची मागणी
प्रभाग दोनमधील 'ब' गटातील उमेदवार सुधीर वाघमोडे यांना अवघ्या १३८ मतांनी पराभव पत्करावा लागला. वाघमोडे मतमोजणी केंद्रात आल्यानंतर त्यांचसहित त्यांचे बंधू आणि कार्यकर्त्यांना रडू कोसळले. वाघमोडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर यांच्याकडे दुबार मतमोजणीची मागणी केली. मात्र, विजयी उमेदवार रवी टिंगरे आणि वाघमोडे यांच्या मतांमधील अंतर अधिक असल्याने बारवकर यांनी दुबार मतमोजणीची मागणी मान्य केली नाही. वाघमोडे यांना न्यायालयात जाण्याचे सांगण्यात आल्याचे समजते. याविषयी बारवकर यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.
साधी स्वच्छतागृहाची देखील सोय नाही
मतमोजणी केंद्रात उपस्थित असलेल्या कर्मचारी, उमेदवार, कार्यकर्ते, पत्रकार आणि पोलिसांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध नसल्याने सर्वांचीच गैरसोय झाली. प्रशासनाकडून मत मोजणी केंद्रांवर विविध सुविधा उपलब्ध केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, या मत मोजणी केंद्रातील सुविधांबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

