

पुणे: उन्हाचा चटका कायम असल्याने बाजारात कलिंगड, खरबूजला, डाळिंब आदी रसदार फळांना मागणी होत आहे. बाजारात दाखल होत असलेल्या आवकच्या तुलनेत मागणी मोठी असल्याने कलिंगड आणि खरबुजाच्या भावात किलोमागे पाच रुपयांनी वाढ झाली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी डाळिंब बागांमध्ये राखून ठेवल्याने मार्केटयार्डात डाळिंबाची आवक घटली आहे. परिणामी, त्याच्या दरातही दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कोकणातील हापूसचा हंगाम संपल्याने तुरळक स्वरूपात हापूस बाजारात दाखल होत आहे. त्याला मागणीही जेमतेम असल्याने त्याचे गत आठवड्यातील दर टिकून आहेत. मॉन्सूनची वर्दी मिळाल्याने येत्या काळात लिंबाला भाव मिळणार नाही, या शक्यतेने शेतकऱ्यांकडून लहान व कच्च्या लिंबाची तोड करून बाजारात विक्रीस पाठविण्यात येत आहे. या लिंबांमध्ये अपेक्षित रस नसल्याने मागणी अभावी त्याचे घटलेले दर टिकून आहेत.
गुलटेकडी मार्केट यार्ड येथील फळबाजारात रविवारी (दि. 24) लिंबूची 1000 ते 1200 गोणी, मोसंबी 20 टन, संत्रा 1 टन, डाळिंब 25 ते 30 टन, पपई 15 ते 20 टेम्पो, कलिंगड 20 ते 25 टेम्पो, खरबूज 10 ते 12 टेम्पो, चिक्कू 1 हजार गोणी, पेरु 200 ते 300 क्रेट, अननस 5 ट्रक आणि हापूस आंब्याची 300 ते 400 पेटी इतकी आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे:
लिंबे (प्रतिगोणी) : 500 ते 1100, मोसंबी : (3 डझन) : 430-680, (4 डझन) : 180-410, संत्रा : (10 किलो) : 500-1100, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 60-200, आरक्ता : 10-60, गणेश : 5-30, कलिंगड : 10- 25, खरबूज : 10-35
पपई : 5-20, चिक्कू (दहा किलो) : 100-600, पेरु (20 किलो) : 300-700, अननस (1 डझन): 100-600, रत्नागिरी हापूस 5 ते 9 डझन (तयार) : 1500 ते 3000, प्लम (2 किलो) : 450-550, पीच (7 ते 8 किलो) : 800-1000, चेरी (1 किलो) : 400-500.