

पुणे: जनगणना कामात निष्काळजीपणा करणाऱ्या तसेच अद्याप कामावर रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत. जनगणना हे राष्ट्रीय कर्तव्य असून, त्यामध्ये कोणतीही कसूर खपवून घेतली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांसमवेत जनगणना कामाचा सविस्तर आढावा घेतला. त्यात शहरातील एचएलबी (हाऊस लिस्टिंग ब्लॉक) 60 टक्के गटांचे काम सुरू झाले असले, तरी उर्वरित गटांचे काम अद्याप सुरू नसल्याबद्दल आयुक्तांनी तीव नाराजी व्यक्त केली. विशेषतः नगर रोड, येरवडा-वाघोली, ढोले पाटील रोड, औंध-बाणेर आणि सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयांतील अनेक गटांचे काम 50 टक्क्यांपर्यंतही सुरू नसल्याचे निदर्शनास आले.
या वेळी संबंधित अधिकाऱ्यांना पुढील दोन दिवसांत सुमारे 11 हजार गटांचे काम ऑनलाइन ॲपद्वारे 100 टक्के सुरू करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले. जनगणना कामासाठी नियुक्त शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून त्यांना रुजू होण्याच्या सूचना देण्याचे निर्देशही देण्यात आले.