गणेश खळदकर :
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये अनेक कंत्राटी प्राध्यापक काम करीत आहेत. त्यांची मुदत चालू महिन्यात संपणार आहे. मात्र, नवीन प्राध्यापकांची नेमणूक करण्यासंदर्भात विद्यापीठाकडून अद्याप कोणतीही हालचाल करण्यात आलेली नाही. त्यामुळे कंत्राटी प्राध्यापक भरतीबाबत विद्यापीठ उदासीन असल्याची माहिती काही प्राध्यापकांनी दिली आहे. विद्यापीठाने सध्या कार्यरत कंत्राटी प्राध्यपकांना मुदतवाढ द्यावी किंवा नवीन प्राध्यापक भरतीबाबत तातडीने पावले उचलावीत, तरच नवीन येणार्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी प्राध्यापक उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु, विद्यापीठ प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला आहे.
यासंदर्भात विद्यापीठाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंत्राटी प्राध्यापकांना शैक्षणिक वर्ष संपेपर्यंतची ऑर्डर देण्यात आली आहे. यंदा शैक्षणिक वर्षाला उशीर झाला आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष 31 मे रोजीच संपणार असे नाही. एखाद्या विभागाचे शैक्षणिक वर्ष जून किंवा जुलैमध्ये संपणार असेल, तर संबंधित प्राध्यापकांना जून-जुलैपर्यंत मुदत राहणारच आहे. त्यामुळे शैक्षणिक कामकाजामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडलेला नाही किंवा पडणारदेखील नाही. पुढच्या शैक्षणिक वर्षासाठी प्राध्यापक भरतीची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू होणार असून, त्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तसेच, जुने शैक्षणिक वर्ष संपून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यासाठी अद्यापही किमान तीन महिन्यांचा कालावधी आहे. या तीन महिन्यांमध्ये आवश्यक ती प्रक्रिया करण्यात येईल आणि नवीन प्राध्यापक उपलब्ध करण्यात येणार आहेत.