

पुणे: पीएमपीच्या ताफ्यात मार्च २०२७ पर्यंत तब्बल ५०० नव्या सीएनजी गाड्या दाखल होणार आहेत. नुकताच पीएमपी प्रशासनाने संबंधित ठेकेदारांना हिरवा कंदील दाखवला असून, पीएमपीच्या पथकाने यातीलच काही नव्या डेमो गाड्यांची प्रत्यक्ष पाहणी देखील केली आहे. त्यानंतरच या गाड्यांना हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.
आता पीएमपीचा ताफा २६०० च्या घरात पोहोचणार
पीएमपी प्रशासनाला या वाढीव नव्या गाड्यांच्या पार्किंग आणि देखभालीसाठी तब्बल १०० एकर जागेची आवश्यकता भासणार असून, त्यासाठी प्रशासनाने संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा सुरू केला आहे. सध्या पीएमपीच्या ताफ्यात २ हजार ११७ बस कार्यरत आहेत.
दोन्ही शहरांचा झपाट्याने होणारा विस्तार आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता बसची संख्या अपुरी पडत आहे. प्रवाशांना वेळेवर आणि आरामदायी सेवा मिळावी, यासाठी प्रशासनाने ताफा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन ५०० गाड्या दाखल झाल्यानंतर पीएमपीचा एकूण ताफा २ हजार ६०० हून अधिक होणार आहे. यामुळे उपनगरांतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, अनेक नवीन मार्गांवर सेवा सुरू करणे शक्य होणार आहे.
जागेसाठी प्रशासनाचा चार यंत्रणांकडे पत्रव्यवहार
दुसरीकडे, सद्यःस्थितीत कार्यरत असलेले आगार (डेपो) पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. त्यामुळे नव्याने दाखल होणाऱ्या ५०० गाड्या उभ्या कुठे करायच्या आणि त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची व्यवस्था कशी करायची, हा मोठा प्रश्न प्रशासनासमोर आहे. या पार्श्वभूमीवर १०० एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. जागेसाठी चार यंत्रणांकडे पत्रव्यवहार नव्या आगारांसाठी लागणारी १०० एकर जागा उपलब्ध करून द्यावी, यासाठी पीएमपी प्रशासनाने पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांच्याकडे माागणी केली आहे.
प्रवाशांना दर्जेदार आणि जलद वाहतूक सेवा देण्यासाठी आम्ही ताफा वाढवत आहोत. मार्च २०२७ पर्यंत ५०० नव्या गाड्या ताफ्यात समाविष्ट होतील. या गाड्यांच्या पार्किंग आणि देखभाल सुविधांसाठी १०० एकर जागेची गरज आहे. याबाबत दोन्ही महापालिका, जिल्हा प्रशासन आणि एमआयडीसीकडे जागेची मागणी करण्यात आली असून, लवकरच सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.
महेश आव्हाड, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल