पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडून ऋषिपंचमीनिमित्त गुरुवारी पहाटे अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अथर्वशीर्ष पठणानिमित्त शहरातील मध्य भागात आज (गुरुवार 28 ऑगस्ट) पहाटेपासून वाहतूक बदल करण्यात आला आहे.
गुरुवारी पहाटे पाचनंतर अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम संपेपर्यंत या छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, अप्पा बळवंत चौक ते हुतात्मा चौक , लक्ष्मी रस्ता परिसरात वाहतूक बदल करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे. (Latest Pune News)
या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज रस्ता (जिजामाता चौक ते रामेश्वर चौक), अप्पा बळवंत चौक ते हुतात्मा चौक (बुधवार चौक), लक्ष्मी रस्ता परिसरातील विजय मारुती चौक ते बेलबाग चौक दरम्यानची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.
असा असेल वाहतूक बदल
छत्रपती शिवाजी रस्त्यावरील जिजामाता चौकातून स्वारगेटकडे जाणार्या वाहनांनी गणेश रस्ता, फडके हौद चौक, देवजीबाबा मंदिर चौकातून उजवीकडे वळून महाराणा प्रतापसिंह रस्ता, हमजेखान चौक, गोविंद हलवाई चौकातून उजवीकडे वळून मंडईतील गोटीराम भैय्या चौकातून स्वारगेटकडे जावे.
अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. वाहनचालकांनी अप्पा बळवंत चौकमार्गे बाजीराव रस्ता, फुटका बुरुज चौक, शनिवारवाडा, छत्रपती शिवाजी रस्ता, जिजामाता चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. लक्ष्मी रस्त्यावरील विजय मारुती चौक ते सोन्या मारुती चौक दरम्यानची वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी सोन्या मारुती चौकातून बोहरी आळी, मिर्झा गालिब चौकमार्गे, नेहरु चौक, गोटीराम भैय्या चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.