

पुणे: महापालिकेच्या बहुतांश नाट्यगृहांमध्ये कॅन्टीनअभावी कलाकार, तंत्रज्ञ आणि रसिकांची होणारी गैरसोय आता दूर होणार आहे. महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाने चार नाट्यगृहांमध्ये कॅन्टीन सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महिनाभरात ही सुविधा सुरू करण्याचे नियोजन आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह, विठ्ठलराव तुपे नाट्यगृह, पंडित भीमसेन जोशी कलामंदिर आणि गणेश कला क्रीडा मंच येथे कॅन्टीन सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसेच बालगंधर्व रंगमंदिरातील बाहेरील कॅफेटेरियाही पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या १६ नाट्यगृहांपैकी सध्या केवळ बालगंधर्व रंगमंदिर (जंगली महाराज रस्ता) आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (कोथरूड) येथे कॅन्टीनची सुविधा उपलब्ध आहे. उर्वरित नाट्यगृहांमध्ये ही सुविधा नसल्याने नाटक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मध्यंतरात चहा, कॉफी किंवा नाश्त्यासाठी कलाकार, तंत्रज्ञ तसेच रसिकांना नाट्यगृहाबाहेर जावे लागते. त्यामुळेच महापालिकेच्या सर्व नाट्यगृहांमध्ये कॅन्टीनची सुविधा सुरू करण्याची मागणी कलाकार, तंत्रज्ञ आणि रसिकांकडून सातत्याने होत होती. या प्रश्नाकडे दै. 'पुढारी'नेही वृत्त प्रसिद्ध करून लक्ष वेधले होते. महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाने आता या मागणीची दखल घेत नाट्यगृहांमध्ये कॅन्टीनची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने निर्णय घेतला आहे.
नाट्यगृहांत महिनाभरात कॅन्टीन
पहिल्या टप्प्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह (पुणे - सातारा रस्ता), विठ्ठलराव तुपे नाट्यगृह (हडपसर) आणि पंडित भीमसेन जोशी कलामंदिर (औंध) येथे कॅन्टीन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या तिन्ही ठिकाणी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महिनाभरात कॅन्टीन सुरू करण्याचे नियोजन आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे किचनसाठी जागेचा प्रश्न असून, त्यासाठी भवन विभागाकडे प्रस्ताव दिला आहे. जागा उपलब्ध झाल्यानंतर येथेही लवकरच कॅन्टीन सुरू होईल.
बालगंधर्वच्या कॅफेटेरियाला पुन्हा मुहूर्त
बालगंधर्व रंगमंदिरातील अनेक वर्षांपासून बंद असलेला बाहेरील कॅफेटेरिया पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. कॅफेटेरिया सुरू झाल्यानंतर चहा - कॉफीसह विविध खाद्यपदार्थ उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे कार्यक्रमाच्या मध्यंतरात कलाकार, तंत्रज्ञ आणि रसिकांना नाट्यगृहाबाहेर धाव घेण्याची गरज भासणार नाही.
महापालिकेच्या ज्या नाट्यगृहांमध्ये नियमितपणे कार्यक्रम होतात, त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने कॅन्टीनची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, विठ्ठलराव तुपे नाट्यगृह आणि पंडित भीमसेन जोशी कलामंदिरासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महिनाभरात कॅन्टीन सुरू करण्यात येणार आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे जागेचा प्रश्न असून, त्यासाठी भवन विभागाकडे प्रस्ताव दिला आहे. बालगंधर्व रंगमंदिरातील कॅफेटेरिया सुरू झाल्यानंतर अधिक खाद्यपदार्थ उपलब्ध होतील.
राजेश कामठे, मुख्य व्यवस्थापक, नाट्यगृह विभाग, महापालिका.