

पुणे: पुणे महापालिकेच्या समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत तळजाई वसाहतीतील बायोगॅस प्रकल्पाजवळ सुरू असलेल्या टाकीच्या बांधकामाच्या ठिकाणी पडून १४ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. या दुर्घटनेत मुलाच्या दोन्ही पायांना गुडघ्याखाली फ्रॅक्चर झाले असून, कंबर, पोट आणि हातालाही दुखापत झाली आहे. दरम्यान, बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना न केल्याच्या आरोपावरून एल अँड टी कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक मनोहर मेहेटा आणि संबंधित कंत्राटदाराविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निखिल नितीन साठे (वय १४) असे जखमी मुलाचे नाव आहे. तो आठवीत शिकतो. १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तो शाळेतून घरी आला. त्यानंतर काही वेळाने मित्र ओम कसबे याच्यासोबत खेळण्यासाठी घराबाहेर गेला. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ओमने घरी येऊन निखिल टाकीत पडल्याचे कुटुंबीयांना सांगितले.
ही माहिती मिळताच निखिलची आई मंजू साठे, आजी आणि काका घटनास्थळी धावले. तळजाईतील बायोगॅस प्रकल्पाजवळ सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामाच्या ठिकाणी निखिल पडलेला दिसला. स्थानिक रहिवासी उद्धव कांबळे यांनी अग्निशमन दलाला फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी निखिलला टाकीतून बाहेर काढले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी संरक्षक जाळी, धोक्याचे सूचना फलक किंवा अन्य आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या, असा आरोप निखिलच्या आईने तक्रारीत केला आहे. या प्रकरणी २१ ऑक्टोबर रोजी कुटुंबीयांनी महापालिकेच्या शिवाजीनगर येथील पाणीपुरवठा विभागात जाऊन चौकशी केली. त्या वेळी संबंधित टाकीचे काम एल अँड टी कंपनीला देण्यात आल्याची माहिती मिळाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
बांधकामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा व्यवस्था न केल्यामुळे निष्काळजीपणा झाला आणि त्यातून मुलाच्या जीविताला धोका निर्माण झाला, असा आरोप करीत मंजू साठे यांनी प्रोजेक्ट मॅनेजर मनोहर मेहेटा आणि संबंधित कंत्राटदाराविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार सहकारनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५ (ब) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक महेश मोरे करीत आहेत.