

पुणे: दिवाळीचा सण तोंडावर आला असताना कंत्राटी कामगारांची आर्थिक ओढाताण होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाने कंत्राटदारांना वेतनाबाबत मुदत घालून दिली आहे. ऑक्टोबर महिन्याचे वेतन ३० तारखेपर्यंत अदा करा, तसेच कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीचा (ईपीएफ) भरणाही विहित मुदतीत करा, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांनी दिले आहेत.
त्यामुळे दिवाळीपूर्वी कंत्राटी कामगारांच्या हातात वेतन पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, वेतनाची प्रतीक्षा संपणार असली, तरी बोनस मिळणार नसल्याने कामगारांची दिवाळी काहीशी निराशाजनक ठरणार आहे. पुणे महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कंत्राटदारांमार्फत मोठ्या संख्येने कामगार नियुक्त केले जातात.
या कामगारांचे वेतन संबंधित विभागातील पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली नोंदविण्यात येणाऱ्या हजेरीनुसार निश्चित केले जाते. वेतन वितरणात विलंब झाल्यास सणासुदीच्या काळात कामगारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने यंदा दिवाळीपूर्वीच वेतन देण्याचे नियोजन केले आहे.
यंदा ५ नोव्हेंबरपासून दिवाळीचा सण सुरू होत असल्याने त्यापूर्वीच कामगारांना संपूर्ण महिन्याचे वेतन मिळावे, यासाठी प्रशासनाने कंत्राटदारांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार, १ ते २० ऑक्टोबर या कालावधीतील प्रत्यक्ष हजेरी आणि २१ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीतील संभाव्य हजेरी विचारात घेऊन ऑक्टोबर महिन्याचे वेतन ३० ऑक्टोबरपर्यंत देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
दिवाळीपूर्वी वेतन मिळणार असले, तरी कंत्राटी कामगारांना यंदा बोनस मिळणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनात केंद्र सरकारच्या नियमानुसार वाढ झाल्यानंतर अनेक कामगारांचे मासिक वेतन २१ हजार रुपयांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) लाभासाठीच्या पात्रतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.