Pune Sugar Stock: साखरेच्या साठेबाजीवर करडी नजर

जिल्हा व तालुकास्तरावर जिल्हा प्रशासनाची तपास पथके; नियमभंग झाल्यास साठा जप्तीसह फौजदारी कारवाई
Sugar
Sugar Pudhari
Published on
Updated on

पुणे: साखरेच्या होणाऱ्या साठेबाजीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे जिल्ह्यात साखर साठवणुकीची तपासणी करण्यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर स्वतंत्र तपास पथके नियुक्त करण्यात आली आहेत. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक साठा किंवा नोंदींमध्ये तफावत आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

केंद्र सरकारने लागू केलेल्या साखर साठा निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ४०० टनांपेक्षा अधिक साखर साठवता येणार नाही, तसेच ३० दिवसांपेक्षा जास्त काळ साठवणूक करता येणार नाही, असे निर्देश दिले आहेत.

या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्हा पुरवठा विभागाला विशेष तपासणी मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्यानुसार जिल्ह्यातील साखर कारखाने, घाऊक विक्रेते, वितरक, व्यापारी आणि मोठ्या ग्राहकांकडील साखरेच्या साठ्याची प्रत्यक्ष पडताळणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा तसेच तालुकास्तरावर स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली आहेत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रासाठी अन्नधान्य वितरण अधिकारी प्रशांत खताळ यांच्या नेतृत्वाखाली पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकात पुरवठा निरीक्षण अधिकारी, पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किंवा सहायक पोलिस निरीक्षक यांचा समावेश आहे.

ग्रामीण भागासाठी सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अंकुश कांबळे हे पथकप्रमुख असतील. प्रत्येक तालुक्यात तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली पुरवठा निरीक्षण अधिकारी आणि संबंधित पोलिस ठाण्याचे अधिकारी असे तीन सदस्यीय पथक कार्यरत राहणार आहे.

Sugar
Pudhari Majha Bappa: पर्यावरणपूरक बाप्पासाठी ‘माझा बाप्पा २०२६’; विद्यार्थी साकारणार पर्यावरणपूरक श्रीगणेशमूर्ती

तपासणी पथके व्यापाऱ्यांची नोंदणीकृत व्यवसायाची ठिकाणे, गोदामांना प्रत्यक्ष भेट देतील. घोषित साठा आणि प्रत्यक्ष साठ्यामध्ये तफावत आढळल्यास संबंधितांविरोधात फौजदारी कारवाई केली जाणार आहे. हे निर्बंध ३० नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहेत.

Sugar
Raksha Bandhan Postal Service: पुण्यातून १२५ देशांत राख्यांची पाठवणी; २० दिवसांत तीन हजारांहून अधिक राख्या रवाना

आकस्मिक तपासणी करा

“जिल्ह्यात साखरेचे सुरळीत वितरण सुरू ठेवण्यासाठी आणि निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त होणारी अवैध साठेबाजी रोखण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर पथके स्थापन केली आहेत. पथकांनी आस्थापनांची आकस्मिक तपासणी करावी. साठ्यात तफावत किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास आवश्यक कायदेशीर कारवाई करून त्याचा अहवाल तातडीने सादर करावा,” असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news