पुणे : पुढारी वृत्तसेवा : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर ठोस पावले उचलावीत आणि एफटीआयआयचे अध्यक्ष आर. माधवन यांच्याशी विद्यार्थ्यांची चर्चा व्हावी, या व अशा विविध मागण्यांसाठी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एफटीआयआय) विद्यार्थी कॅम्पसमध्ये आंदोलन करीत आहेत. बाबरी मशिदीसंदर्भात लावलेल्या फलकावरून विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. विद्यार्थ्यांनी वर्गांना जाणेही बंद केले असून, आंदोलनात सुमारे 250 हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. जोपर्यंत एफटीआयआय प्रशासन आम्हाला सुरक्षेची हमी देत नाही आणि विद्यार्थ्यांना मारहाण करणार्यांवर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
एफटीआयआय स्टुडंट्स असोसिएशनकडून संस्थेच्या कॅम्पसमध्ये बाबरी मशिदीसंदर्भात एक फलक काही दिवसांपूर्वी लावला होता. ही माहिती मिळाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांमधील कार्यकर्त्यांनी एफटीआयआयमध्ये शिरून ते फलक फाडले आणि जाळले तसेच विद्यार्थ्यांना मारहाणही केली. तर हिंदुत्वावादी कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांनी आम्हाला मारहाण केली, असे सांगितले. यावरून एफटीआयआयमध्ये बराच गोंधळ निर्माण झाला. पण या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळेच कॅम्पसमधील विस्डम ट्री येथे विद्यार्थी आंदोलन करीत आहेत.
विद्यार्थ्यांनी एफटीआयआयचे संचालक आणि कुलसचिव यांच्यासोबत याबाबत चर्चाही केली. पण, ही चर्चाही फिस्कटली आहे. एफटीआयआय प्रशासनाने आमचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि संस्थेने आमच्या पाठीशी उभे राहावे, अशा मागण्यांसाठी विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. या घटनेबाबत एफटीआयआयचे अध्यक्ष आर. माधवन यांनी आपली भूमिका मांडावी, विद्यार्थ्यांशी चर्चा करावी, असे आमचे म्हणणे आहे. याबाबत एफटीआयआयचे संचालक संदीप शहारे यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.
हेही वाचा