AUS vs SA : फलंदाज बाद की नाबाद? भर मैदानात पंचांचा गोंधळ! | पुढारी

AUS vs SA : फलंदाज बाद की नाबाद? भर मैदानात पंचांचा गोंधळ!

सिडनी, वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलिया – द. आफ्रिका (AUS vs SA) यांच्यातील महिला एकदिवसीय सामन्यात बुधवारी वेगळेच नाट्य घडले आणि क्षणभर स्टेडियममध्ये हास्याचे फवारे उडाले. पावसाच्या व्यत्ययामुळे पाच षटकांची कपात केल्या गेलेल्या या लढतीत आफ्रिकन संघाची फलंदाजी सुरू असताना महिला पंचांनी रिव्ह्यूचा एक निकाल देताना नाबादऐवजी फलंदाज चक्क बाद असल्याची खूण केली आणि यामुळे मिनीटभर मैदानात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

उभय संघातील दुसरा एकदिवसीय सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला गेला. या लढतीत ऑस्ट्रेलियाची अ‍ॅश्ले गार्डनर डावातील 43 वे षटक टाकत असताना हे नाट्य घडले. या षटकातील पाचवा चेंडू दक्षिण आफ्रिकन फलंदाज सन लूसच्या पॅडवर आदळला आणि ऑस्ट्रेलियन संघाने यावर जोरदार अपील केले. मैदानी पंचांनी या अपिलाचा फारसा विचार केला नाही. मात्र, ऑस्ट्रेलियन कर्णधार याविरोधात डीआरएस घेतला.

डीआरएसमध्ये चेंडू स्टम्पबाहेर जात असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. यामुळे फलंदाज बाद असण्याचा काही प्रश्नच नव्हता. स्टेडियममधील स्क्रीनवरदेखील फलंदाज नाबाद असल्याचा फलक झळकला आणि एव्हाना मैदानी पंचांना तिसर्‍या पंचांनी आपला निर्णय कायम ठेवण्याची सूचना केली होती. मात्र, प्रत्यक्षात मैदानी पंचाचा क्षणभर गोंधळ उडाला आणि त्यांनी चुकून बोट वर करत फलंदाज बादचा इशारा केला. अर्थात, ही चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वत:ला लवकरच सावरले आणि हा निर्णय मागे घेत असल्याची खूण केली. मैदानी पंचांचा हा भर मैदानावरील गोंधळ पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मात्र आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहिला नाही.

या घटनेचा मजेदार व्हिडीओ क्रिकेट डॉट कॉम एयूने अधिकृत एक्स अकाऊंटवरून शेअर केला. सोशल मीडियावर चाहत्यांची या व्हिडीओला बरीच पसंती मिळणार, हे साहजिकच होते आणि विविध प्रतिक्रियांची त्यावर बरसातही झाली.

Back to top button