सख्ख्या भावांनीच केला पळून जाऊन प्रेमविवाह केलेल्या बहिणीचा घात

सख्ख्या भावांनीच केला पळून जाऊन प्रेमविवाह केलेल्या बहिणीचा घात
Published on
Updated on

मुरगूड, पुढारी वृत्तसेवा : प्रेम प्रकरणातून पळून जाऊन प्रेमविवाह केला. त्यानंतर मेव्हणा बहिणीला माहेरी पाठवत नाही, याबद्दलचा राग मनात धरून मेव्हण्याचा काटा काढता काढता बहिणीचाच खून सख्ख्या भावांनी केल्याची घटना लिंगनूर कापशी येथे मंगळवारी घडली. मुरगूड पोलिसांत देवेंद्रप्पा व टायटन पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी मृत महिलेचे सख्खे भाऊ फरारी आहेत.

बुलढाणा येथील फासेपारधी समाजातील सिकसेन मुरलीधर भोसले (वय 45) याने खामगाव (जि. अमरावती) येथील येवनबाई पवार हिच्याशी 2007 साली प्रेम प्रकरणातून पळून जाऊन विवाह केला होता. त्यानंतर पती सिकसेन हा पत्नी येवनबाईला माहेरी पाठवत नव्हता. याच रागातून येवनबाईचे भाऊ देवेंद्रप्पा आदमास पवार व टायटन आदमास पवार (रा. अंजनगाव, जि. अमरावती) यांनी मंगळवारी सायंकाळी मेव्हणा सिकसेन भोसले यास आपल्या लग्नाच्या सत्काराच्या बहाण्याने लिंगनूर (कापशी) या ठिकाणी बोलवून घेतले. आल्यानंतर देवेंद्रप्पा व टायटन पवार यांनी आपल्या बहिणीला माहेरी का पाठवत नाहीस, म्हणून जाब विचारला. या वादातून त्यांच्यात हाणामारी सुरू झाली.

पवार बंधूंनी सिकसेन भोसलेला भाल्याच्या पात्याने भोसकण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सिकसेनच्या डाव्या बाजूच्या खांद्याला पाठीमागून भाला घासून गेला. एवढ्यात सिकसेनची पत्नी येवनबाई आडवी येत नवर्‍याला मारू नका, अशी विनवणी करू लागली; पण तिच्या भावांनी येवनबाईच्या डाव्या बाजूच्या छातीवर भाल्याने भोसकले. यात ती जागीच ठार झाली. मेव्हण्याचा काटा काढता काढता भावांनी बहिणीचाच घात केला. यानंतर या भावांनी तेथून पलायन केले.

बुलढाण्याच्या महिलेचा परमुलुखात खून, ना कोणी भाऊबंद ना कोणी नातेवाईक, मृतदेह पाठवायचा कोणाकडे? अखेर पोलिसांनीच मुरगूड नगरपालिकेच्या मदतीने येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.

मुलांचा आक्रोश..

मंगळवारी रात्री घडलेल्या या खून प्रकरणानंतर पोलिसांनी मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या दारात आणला. यावेळी मृत महिला येवनबाईच्या भेदरलेल्या दोन मुलांनी टाहो फोडला. आमच्या आईला अ‍ॅडमिट करून घ्या, डॉक्टरना बोलवा व तिच्यावर उपचार करा, असे आक्रोश करीत सांगत होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news